"आदिनाथ" कारखान्याची घरघर अद्याप सुरूच - या हंगामातही कारखाना सुरु होणार की नाही ?? याबाबत साशंकता..! - Saptahik Sandesh

“आदिनाथ” कारखान्याची घरघर अद्याप सुरूच – या हंगामातही कारखाना सुरु होणार की नाही ?? याबाबत साशंकता..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या बारामती ॲग्रोला ऐनवेळी नारायण पाटील यांचे हस्तक्षेपामुळे व त्यांनी १ कोटी रूपये बँकेच्या कर्ज खात्यात भरल्यामुळे कारखान्याच ताबा तात्पुरता तरी बारामती ॲग्रोला मिळाला नाही. त्यामुळे आदिनाथ कारखाना चालू करण्याच्या बारामती ॲग्रोच्या प्रयत्नाला खीळ बसली असून, राजकारण व न्यायालयीन प्रक्रियेच्या लढाईत कारखाना नेमका कोण चालविणार की यावर्षीचाही हंगाम वाया जाणार, याबाबत तर्क-विर्तक लढविले जात आहेत. असे असलेतरी दोन्ही बाजूने कारखाना चालू करण्याचा दावा केला आहे.

आदिनाथ कारखान्यावर बागल गटाचे संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने राज्य सहकारी बँकेने हा कारखाना लिलाव प्रक्रिया करून बारामती ॲग्रोला २५ वर्षे भाडेपट्ट्याने करार करून दिला आहे. परंतू गेल्या अडीच ते तीन वर्षापासून प्रत्यक्षात कारखान्याचा ताबा काही तांत्रिक त्रुटीमुळे बारामती ॲग्रोला मिळाला नाही.
त्यामुळे त्यांना कारखाना चालू करता आला नाही. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचे मात्र आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. सदरचा करार बेकायदेशीर झाल्याच्या मुद्यावर काही सभासद डीआरटी कोर्टात गेले होते. त्यावर कोर्टाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती नुकतीच बारामती ॲग्रोने उठवून कोर्टाने बारामती ॲग्रोला आठ दिवसात कारखान्याचा ताबा देण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व अन्य सहकारी कारखान्याचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी मात्र माजी आमदार नारायण पाटील यांनी आम्ही कारखान्याच्या कर्जापोटी बँकेच्या खात्यात एक कोटी रूपये भरले आहेत.

त्यामुळे बारामती ॲग्रोचा करार संपुष्टात आला असून आम्ही हा कारखाना सहकारी तत्वावर चालविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांनी कारखान्याच्या या प्रक्रियेत उडी घेतल्याने आता नवीन वळण लागले आहे. एवढेच नाहीतर बारामती ॲग्रो पुढे पाटील यांच्या भुमिकेमुळे आता अडचणी उभ्या राहिल्या आहेत. नारायण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याने हा कारखाना आपण सहकारी तत्वावर चालविणार आहोत; असे ठामपणे सांगितले आहे.

दुसरीकडे बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही झालेतरी बारामती ॲग्रोच आदिनाथ कारखाना चालविणार असल्याचे सांगितले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, की आदिनाथ कारखाना चालवितो म्हणणाऱ्यांनीच हा कारखाना आर्थिक अडचणीत आणला आहे. हे सर्व तालुक्यातील सभासदांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांना कारखाना चालविता न आल्याने त्यांनीच बारामती ॲग्रो बरोबर करार केला आहे. बारामती ॲग्रोवर सभासदांचा विश्वास असून आम्ही दरही चांगला देत आहोत.

आदिनाथ चालू होणार अशी प्रक्रिया चालू असतानाच आता त्यामध्ये राजकारण व न्यायप्रक्रिया निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमका आदिनाथ चालू होणार की नाही ? याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात असून चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चालू प्रक्रियेत मात्र आमदार संजयमामा शिंदे गटाने सावध भुमिका घेतली असून, त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे आगामी कालावधीत आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नेमकी काय भुमिका असणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

काही करा पण कारखाना चालू करा..!

आदिनाथ कारखाना राजकारण व न्यायप्रक्रियेत अडकला असलातरी तालुक्यातील सर्व गटाच्या नेतेमंडळींनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. शेतकरी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना लवकरात लवकर चालू करावा. मग तो कोणीही केलातरी सभासदांना काहीही अडचण नाही; अशाही प्रतिक्रीया काही सभासदांनी व्यक्त केल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!