करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर - १८ ऑगस्टला मतदान - Saptahik Sandesh

करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर – १८ ऑगस्टला मतदान

करमाळा नगर परिषद

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज (ता. ८) निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे करमाळा शहरातील सर्व इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, पक्षीय व संघटना पातळीवर चर्चा चालू झाल्या आहेत.

करमाळा नगरपरिषदेची २० प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानूसार प्रभाग रचनेचे आरक्षणही काढण्यात आले आहे. या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष ऐवजी नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. काही पक्षांनी जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची मागणी केली आहे. परंतू निवडणूक आयोगाने अद्याप तसे काही जाहीर केले नाही. करमाळा नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण तयारी येथील निवडणूक कार्यालयाने केली असून, शहरातील सर्व मतदान केंद्राची पाहणी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दोन दिवसापूर्वीच प्रत्यक्ष जावून पाहणी केली आहे.

२० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणुक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. २२ ते २८ जुलै पर्यंत सकाळी अकरा ते दोन या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. उमेदवारी अर्जाची छाननी २९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे व त्याच दिवशी उमेदवाराची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. ४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्जावर अपील किंवा हरकत असल्यास अपीला निर्णय ज्या तारखेस करता येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी किंवा ८ ऑगस्ट २०२२ पर्यंत निर्णय देण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी ४ ऑगस्ट रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. १८ ऑगस्टला सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी १९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी दोन आठवडे प्रचाराचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे.

करमाळा नगरपरिषदेत सर्वात जास्त काळ सत्ता जगताप गटाने उपभोगली आहे. या निवडणुकीत जगताप गटाने पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रभागनिहाय जोरदार तयारी केली आहे. असे असलेतरी या निवडणुकीत कोणत्या गटाबरोबर युती होणार हे मात्र अद्याप जगताप गटाने स्पष्ट केले नाही.

बागल गट, नागरीक संघटना व सावंत गट यांच्या युतीची चर्चा असलीतरी त्यांनीही ठोस भुमिका घेऊन युतीबाबत घोषणा केलेली नाही. भाजपा, शिवसेना युती करून लढणार की अन्य पक्षीय संघटनेबरोबर युती करून स्वतंत्र लढणार, याबाबतही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!