तालुक्यातील ऊस तालुक्यातच गाळप झाला पाहिजे ; शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पॅनल उभा केला – प्रा.रामदास झोळ

करमाळा(दि.१८): सहकार टिकला पाहिजे, शेतकरी सभासदांना कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून योग्य न्याय दिला पाहिजे, तालुक्यातील ऊस तालुक्यातच गाळप झाला पाहिजे, या उद्देशाने आपण पॅनल उभा केला आहे. परंतु विविध गटातून कारखान्यासाठी स्वनिधी टाकणारे उमेदवार एकत्र येणार असतील तर आम्ही कारखाना बिनविरोध करण्यासाठी तयार आहोत झोळ गटाचे नेते श्री. रामदास झोळ यांनी सांगितले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झोळ गटाकडून ३१ उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, आम्ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण दहा गटापैकी सर्वच गटांमध्ये ३१ उमेदवारी अर्ज भरून पूर्ण पॅनल तयार केला आहे. सर्वच राजकीय गटाने मिळून 273 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अतिशय प्रचंड प्रतिसाद संचालक होण्यासाठी दिसून येत आहे हाच प्रतिसाद जर सर्वांनी आदिनाथ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व सहकार तत्वावर चालण्यासाठी दाखवला तर नक्कीच आदिनाथ कारखान्याला चांगले दिवस येतील. शेतकऱ्यांचे मंदिर असलेला आदिनाथ अडचणीतून बाहेर निघावा ही आमची मनोमन इच्छा आहे. ऊस आपल्या तालुक्यात पिकला जातो आणि गाळपासाठी इतर तालुक्यात जातो याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. इतर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे आदिनाथ कारखाना चांगल्या पद्धतीने ऊस गाळप करू शकतो. तसेच अडचणीत असलेला साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असेही यावेळी झोळ सर यांनी सांगितले.





