तुटलेली वीजवाहक तार ठरली जीवघेणी; गुळसडीत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा (प्रतिनिधी) : गुळसडी येथे शेतात काम करत असताना विजेच्या तारेचा धक्का लागून विजय वसंत क्षीरसागर (वय ६०) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

क्षीरसागर हे आपल्या शेतातील उसामध्ये तणनाशक फवारणीचे काम करत होते. याच शेतात वीजवाहक तार तुटून पडलेली होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही तार गेल्या काही दिवसांपासून शेतात पडून होती. ती हटविण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही तार काढण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तार जमिनीवर पडलेली असताना वीजपुरवठा सुरू कसा ठेवण्यात आला, तसेच सूचना मिळूनही संबंधितांनी तातडीने उपाययोजना का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
विजेचा धक्का लागल्यानंतर क्षीरसागर यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तलाठ्याला घटनास्थळी पाठविले. पोलिस निरीक्षक रणजित माने यांनीही पोलिस हवालदार दीपक घोरपडे यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, गंभीर घटना घडूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला. संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येत संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.
यानंतर पोलिस निरीक्षक रणजित माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि सुनील सावंत यांनी मध्यस्थी केली. महावितरणचे शाखाधिकारी श्री. बारगळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी कायदेशीर पातळीवर आवश्यक ती मदत केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले.

लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. उपजिल्हा रुग्णालयात गणेश चिवटे, सुनील सावंत, जगदीश अग्रवाल यांच्यासह गुळसडी येथील अनेक ग्रामस्थ आणि महावितरणचे शाखाधिकारी बारगळ उपस्थित होते.
दरम्यान, वीजवाहक तार पडल्याची माहिती संबंधित यंत्रणेला मिळाल्यानंतरही ती वेळेत हटविण्यात आली असती तर हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

