
केम (संजय जाधव): कुंभेज फाटा ते रामवाडी रस्त्यावर उमरड येथील धोकादायक ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावा, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी उमरड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी दिली.
उमरड येथील कोठावळे शॉपिंग सेंटरजवळ रस्त्याचा धोकादायक वळणाचा भाग आहे. या ठिकाणाहून एका बाजूला पूर्व सोगावच्या दिशेने, तर दुसऱ्या बाजूला उमरड गावातील बाजारतळाकडे रस्ता जातो. या परिसरातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथे गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
तसेच चौधरी वलटे वस्ती परिसरात रस्ता बोगद्यातून जात असून, या ठिकाणीही धोकादायक वळण आहे. जवळच जिल्हा परिषद शाळा असून, बोगद्यातून पोंधवडीच्या दिशेने जाणारा रस्ताही आहे. त्यामुळे या ठिकाणीही गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत झालेल्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन जणांचे पाय मोडले आहेत. त्यापैकी दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच विजय सोनवणे यांच्या घरावर सिमेंट खडी घेऊन जाणारा दहा चाकी टिपर पलटी झाल्याची घटनाही घडली आहे.
गतिरोधक उभारण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा येथील उपअभियंत्यांकडे गेल्या दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करण्यात आला असून, आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अद्याप मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप राजाभाऊ कदम यांनी केला आहे.
अपघातप्रवण ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, या मागणीसाठी अखेर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राजाभाऊ कदम करणार आहेत.

या आंदोलनाबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज तसेच उपविभागीय कार्यालय करमाळा यांना देण्यात आले आहे.




