संरक्षित घोरपडीची शिकार; हूलगेवाडीत दोघांवर वनविभागाची कारवाई -

संरक्षित घोरपडीची शिकार; हूलगेवाडीत दोघांवर वनविभागाची कारवाई

0

करमाळा:माळढोक पक्षी अभयारण्य अंतर्गत मौजे हूलगेवाडी, गट क्र. ३२, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे संरक्षित वन्यप्राणी घोरपड याची  शिकार करून तिला ताब्यात ठेवणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध वनविभागाने कारवाई केली आहे. दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी वन क्षेत्रात नेहमीची गस्त  करत असताना वनअधिकारी यांना  दुपारच्या  सुमारास, सदर परिसरात घोरपडीची शिकार केल्याचे दिसून आले .


वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता अक्षय शिवदास गोरे अंदाजे वय ३० वर्षे व सुरेश रामदास गायकवाड अंदाजे वय  ४० वर्षे दोन्ही रा वंजारवाडी ता करमाळा येथील असून हे दोघे अभयारण्य चे राखीव वनक्षेत्रात  शिकार करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यात एक जिवंत परंतु जखमी अवस्थेतील घोरपड आढळून आली. तसेच त्यांच्याकडून ३ जाळे आढळून आले. सदर घोरपड व जाळे जप्त करण्यात आले.


सदर दोन्ही आरोपींना दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, करमाळा यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २ दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षी अभयारण्या करमाळा हे करत आहेत.



या यशस्वी कारवाईमध्ये मा. उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग पुणे श्री. केशव वाबळे,  सहाय्यक वनसंरक्षक, माळढोक पक्षीअभयारण्य श्री. प्रदिप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती. रोहिणी साळुंखे, वनपाल श्री. अनंता कारंडे, श्रीमती पद्मिनी कांबळे. वनरक्षक श्रीमती माधुरी जाधव ,  श्री. प्रदीप शिंदे , श्री. बबन दहातोंडे , श्री नवनाथ दळवी तसेच सर्व वनमजूर व रेंज स्टाफ सक्रिय सहभाग घेऊन ही यशस्वी कारवाई केली .वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि अभयारण्यांचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून वन्यजीव विभाग अशा गुन्ह्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येईल   – आर. एच. साळुंखे, वरपरिक्षेत्र अधिकरी   माळढोक पक्षी अभयारण्य करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!