उजनीच्या पाण्यावर आढळले हिमालयातील ग्रिफन गिधाड.. - Saptahik Sandesh

उजनीच्या पाण्यावर आढळले हिमालयातील ग्रिफन गिधाड..

वाशिंबे / प्रतिनिधी : सुयोग झोळ…
वाशिंबे (ता.३१) :
स्थानिक पक्षांबरोबर स्थलांतरित पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रात प्रथमच हिमालयातील ग्रिफन नावाचे गिधाड विहारासाठी आलेली नोंद झाली आहे. त्यामुळे उजनी भवताली विहार करणाऱ्या पक्ष्यांच्या वैभवात भर पडली आहे.

पांढरे गिधाड व मोठी गिधाड या नावाने परिचित असलेली या गिधाडांनी मागच्या आठवड्यात उजनी पाणलोट क्षेत्रातील कुंभारगाव परिसरात जोडीने विहार करताना स्थानिक पक्षी निरीक्षकांना प्रथमच दर्शन दिले. इंग्रजीत इंडियन ग्रिफन व्हल्चर किंवा हिमालयन व्हल्चर या नावाने ओळखणारी ही गिधाडं, धरण निर्मिती नंतर उजनी परिसरात पहिल्यांदाच आल्याचे मत पक्षी निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.

पाकिस्तान, नेपाळ, उत्तर भारतातील पहाडी परिसर व हिमालय पर्वत रांगेत वास्तव्याला असणारी ही गिधाडे हिवाळी पाहुणे म्हणून भारताच्या दख्खन भागातील महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यात तीन चार महिन्यांच्या वास्तव्याला येतात. भारतात आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या गिधाडांपैकी ग्रिफान गिधाड सर्वात मोठ्या आकाराचे असून, तपकिरी रंगाची पिसे असलेल्या या गिधाडाच्या मानेवर पिसे नसतात. डोक्यावर पिवळट पांढरी केसांसारखी बारीक पिसे असतात. पोटा खालचा भाग गुलाबी व उदी रंगाचा असतो व त्यावर पिवळसर पट्टे असतात. यातील‌ नर व मादी दिसायला सारखेच असतात. दरवर्षी उष्ण काळात हे पक्षी पाकिस्तान आणि काश्मीरच्या खोऱ्यात वीण घालतात. पावसाळ्यात पिल्ले मोठी होतात.

जिप्स फल्विस (Gyps fulvis) असे शास्त्रीय नाव असलेली ही गिधाडं उजनी परिसरात पहिल्यांदाच आल्याचा अंदाज पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
नैसर्गिक अन्नसाखळीत गिधाडे महत्वाची भूमिका बजावतात. भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात; मात्र यातील बऱ्याच प्रजातींची संख्या मागील काही दशकांत अचानकपणे कमी झाल्याची बाब गंभीर आहे. दोन वर्षांपूर्वी उजनी परिसरात युरोशियन गिधाडे आपली अस्तित्व दाखवले होते. त्यानंतर ग्रिफन गिधाडे या ठिकाणी आल्यामुळे उजनी पक्षी वैभवात भर पडली आहे.


निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखले जाणाऱ्या गिधाडांची संख्या मानवी अतिक्रमणामुळे प्रचंड वेगाने रोडावली आहे. नव्वदच्या दशकात जिल्ह्यातून गायब झालेली गिधाडे अधूनमधून आपलं अस्तित्व अप्रूपाने दाखवत आहेत. झपाट्याने नामशेष होत असलेल्या गिधाडांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.
— डॉ.अरविंद कुंभार (ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!