निर्भय बनो! - Saptahik Sandesh

निर्भय बनो!

शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे तसेच देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य एकट्या महाराष्ट्रात आहे.याच आपल्या महाराष्ट्रात काल परवा महात्मा फुलेंचा सहवास लाभलेल्या पुणे येथे जेष्ठ पत्रकार निखिल वागळे,ॲड.असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर एका विशिष्ट धार्मिकतेचा पगडा असलेल्या राजकीय गुंडांच्या टोळक्यांनी प्राणघातक हल्ला केला पण सुदैवाने तेथे काही लोकशाही मानणारे राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना इत्यादींच्या माध्यमातून तो हल्ला परतवून लावण्यात आला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे विश्वासाने पाहिले जाते.पण आज याच पत्रकारितेला, मेनस्ट्रीम इलेक्ट्रॉनिक एका विशिष्ट राजकीय पक्षाची दलाली करणाऱ्या मीडियामुळे लोकांचा पत्रकारीतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे त्याच कारण म्हणजे काही मिडिया चॅनल,त्यांचे संपादक,मालक हे जनतेचे मूलभूत प्रश्न न दाखवता सरकारच्या चुकीच्या धोरणांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून जाणीवपूर्वक नको त्या बातम्या आपल्या माथी मारतात आणि सरकारी जाहिरात व इत्यादी माध्यमांतून बक्कळ पैसे कमवत आहेत,पण यातही काही निर्भिड निष्पक्षपणे पत्रकारीता करणारे पत्रकार आहेत जे जीवावर उदार होऊन जनतेच्या प्रश्नांना हात घालून सरकारला धारेवर धरतात त्याचाच प्रत्यय कालच्या निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून पाहायला मिळाला, सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर बोलणे जनतेमध्ये जागृती करणे लढा देणे हा अधिकार भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून सर्व भारतीयांना दिलेला आहे मग अशा वेळेस त्याचा वापर करायचा नाही तर मग कधी करायचा? का मग लाचार होऊन दलाली करणारा मिडिया जो दाखवतो तेच खरे मानायचे ? त्यामुळेच आज टिव्ही वरील मिडिया चॅनेलवाले दाखवतात ती खरी पत्रकारिता नाही हे जनतेला समजत आहे त्यामुळेच आज बहुतेक जण सोशल मीडिया, युट्यूबवर जे पत्रकार पूर्वी टीव्हीवरील मिडियामध्ये काम करत होते पण त्यांनी मानसिक गुलामी नाकारुन लाखो रुपयांची नोकरी सोडून स्वतचे मत निर्भिडपणे मांडण्यासाठी युट्यूब सारखे माध्यम निवडले आहे त्याला लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे कारण ते सत्य मांडतात लोकशाही मानतात म्हणूनच.

देशात आणि राज्यात विशेषता आपल्या महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय याचाच जाब विचारण्यासाठी जे लोक सरकारला प्रश्न करतात त्यांच्यावरच हे सरकार खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे पत्रकार भूमिका मांडत आहेत त्यांच्या पाठीशी आपण लोकांनी उभं राहण महत्त्वाचं आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाच्या माध्यमातून जे केल, महात्मा फुलेंनी दीनबंधू च्या माध्यमातून केल आगरकरांनीही जे पत्रकारीच्या माध्यमातून केल तेच आज निखिल वागळे यांच्यासारखे हाडाचे पत्रकार करत आहेत दीन-दुबळ्यांचा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत हक्कांचा जागर ते करत आहेत हूकूमशाही वृत्तीवर आवाज उठवत आहेत हीच खरी पत्रकारिता आहे,ना कि दलाली लाचारी पत्करुन जे विशिष्ट राजकीय पक्षांच्या पालखीचे भोई होऊन षंड होऊन बसलेत एसीत बसून भांडवलदारांच्या ताटाखालचे मांजर होऊन मिडिया विकत ज्यांनी घेतली आहे त्यांचे उदो उदो जे करत आहेत ती पत्रकारीता नव्हे.

निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर बहुतेक मिडियाने साधा निषेधही नोंदवला नाही एका पत्रकारावर हल्ला झाला तरीही बाकीचे पत्रकार गप्प आहेत कारण ते बटिक झालेले आहेत त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे कि अशा निर्भिड पत्रकार असो, सामाजिक कार्यकर्ते असो किंवा इतर कोणीही असो जो जनतेला जागृत करेल सरकारच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवत राहील अशांच्या पाठीशी एक भारतीय म्हणून आपणही निर्भिडपणे उभे राहिले पाहिजे तरच लोकशाही टिकेल त्यामुळे निर्भिड बनो.

✍️ समाधान दणाने, करमाळा जिल्हा-सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!