धगधगते यज्ञकुंड थंड..! - Saptahik Sandesh

धगधगते यज्ञकुंड थंड..!

करमाळा शहरातील जैन परिवारातील महान तपस्वी व धर्मावर श्रध्दा ठेवणाऱ्या आणि आयुष्यभर धगधगते यज्ञकुंड म्हणून जीवन जगलेल्या तेजीबाई पन्नालाल खाटेर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी ३१ ऑक्टोबरला निधन झाले.

तेजीबाई यांचा जन्म वाडेबोलाई (पुणे) येथे शेठीया परिवारात झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे चौथी पर्यंत शिक्षण झालेले होते. कोरेगाव येथील पन्नालाल खाटेर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. पन्नालाल खाटेर हे अतिशय कडक शिस्तीचे तसेच धर्मकार्यात परायण असलेले आणि तपामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले व्यक्तीमत्व होते. लग्नानंतर त्यांना पहिल्या सहा मुली व त्यानंतर मुलगा श्रेणिक यांचा जन्म झाला.

कोरेगाव नंतर खाटेर परिवार हा करमाळा येथे राहण्यास आला. त्यावेळी तेजीबाई यांनी घरातील आर्थिक स्थितीकडे फारसे लक्ष न देता आपल्या सर्व मुलींना त्यांनी पदवीपर्यंत शिकवले. मुली शिकवताना पैशाची चणचण भासवत असताना स्वतः शिलाई काम शिकून शिवणयंत्रावर ब्लाऊज शिवण्याचे काम त्यांनी त्याकाळात केले. शिकलेल्या मुलींनी शिक्षणानंतर काही काळ नोकरी सुध्दा केली.

थोडक्यात आपल्या मुलींना स्वयंभू बनवून त्यांची लग्ने केली आहेत. मुलगा श्रेणिक याचीही सर्व प्रकारची काळजी घेत पदवी पर्यतं शिक्षण पूर्ण करून व्यवसायात उतरविले. आपल्या सातही मुलांवर जैन धर्माची शिकवण तेजीबाई यांनी अतिशय सहजतेने दिली आहे. एवढेच नाहीतर आपल्या धर्माबरोबरच अन्य धर्मियांबाबत प्रेमाची भावना शिकवली. यातूनच श्रेणिकशेठ खाटेर यांनी भागवत कथा, रामायण कथा, शिवकथा, बालयोगी ओत्तूरकर महाराज यांचे भागवत अशा अनेक कथा सादर केल्या. या प्रत्येक कथेला तेजीबाई खाटेर या सुरूवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहत होत्या. आपल्या मुलानं सतत धार्मिक कार्यात कार्यरत रहावे, यातूनच त्यांनी गुरूगणेश गोपालन संस्था उभी करण्याचे सुचविले. त्यातूनच श्री. खाटेर यांनी नगररोडवरील करोडो रू. किंमतीच्या जागेवर गोरक्षण संस्था उभी केली आहे.

तेजीबाई यांनी आयुष्यभर साधूसंताची सेवा केली. उपवास केले आणि तपश्चर्यामध्येही त्या अग्रेसर राहिल्या आहेत. एका वर्षात त्यांनी तीन उपध्यान तप, वर्धमान तप पाया, अनेकवेळा आयंबिल ओळी, एकासना वर्षीतप असे महान तप केले आहेत. याशिवाय संमेद शिखरजी पालीतांना, गिरनार, छरीपारी यात्रा अशा जैन धर्म तीर्थक्षेत्री त्या अनेकवेळा जाऊन आल्या आहेत. त्यांना दोन वेळा आदर्शमाता पुरस्कार मिळालेले आहेत. थोडक्यात आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी संसारापेक्षा जास्तीत जास्त काळ तप व धर्म यामध्ये व्यतित केला आहे. I

पती पन्नालाल खाटेर यांच्या निधनानंतर त्या मनाने खचल्या. त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार झाले. मुलगा श्रेणिकशेठ खाटेर सुन संगीता खाटेर, नातू अॅड.संकेत खाटेर, वर्धमान खाटेर, नातसून मोक्षा खाटेर यांनी त्यांची खूप चांगली सेवा केली. तरीही ३१ ऑक्टोबरला त्यांची तब्येत नरम झाली. शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांशी त्या बोलत होत्या. धर्म करा.. जप करा.. प्रवचन ऐका आणि आपले मिळालेले आयुष्य सद्कारणी लावा..! असे म्हणत आपल्या दुसऱ्या पंतुचा चेहरा पाहून त्या प्रसन्न मनाने यहलोकीची यात्रा सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्याने एक धगधगत यज्ञकुंड थंड झालं असं म्हटलंतर वावगं ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!