१४ लाख रुपये पळविलेल्या करंजे येथील पवारला अटक – दोन दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा बसस्थानकावर चहा पिण्यासाठी बोलत बसले असताना उभा असलेल्या कार गाडीतून १४ लाख रुपये असलेली बॅग करंजे येथील शरद पवार या व्यक्तीने पळवून नेली होती, हा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला होता. या प्रकरणात माजी उपसरपंच शरद पवार या संशयित आरोपीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अखेर आरोपी शरद पवार याला करमाळा पोलिसांनी पकडले असून, आज करमाळा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
२७ ऑक्टोबरला ही चोरी झाल्यानंतर २८ ऑक्टोबरला करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, मात्र संशयित आरोपीचा मोबाईल बंद होता. त्याचे लोकेशन पनवेल दाखवत होते. मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दरम्यानच्या काळात संशयित आरोपीने त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये जमा केले. संबंधित बँकेत पोलिसांनी तात्काळ माहिती घेतली. पुढे तपास करताना संशयित आरोपीची करंजे, करमाळा, पुणे अशा विविध ठिकाणी जावुन चौकशी केली.
दरम्यान संशयित आरोपी हा करमाळ्यातील बायपासरोडवरील एका हॉटेलजवळ येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उबाळे यांनी त्याला सापळा लावून पकडले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी, सोमनाथ जगताप आदींनी मदत केली.अखेर आरोपी शरद पवार याला करमाळा पोलिसांनी आज करमाळा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.