शेटफळ येथील दुकानदारास भररस्त्यात काठीने मारहाण - मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Saptahik Sandesh

शेटफळ येथील दुकानदारास भररस्त्यात काठीने मारहाण – मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

करमाळा : शेटफळ (नागोबाचे) येथील कृष्णा सोनटक्के या दुकानदाराला २६ तारखेला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास 4 व्यक्तींनी मिळून काठीने, लोखंडी पाईपने व लाथा बुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. यामध्ये सोनटक्के यांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे नेण्यात आले.

सदर मारहाणीची एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. या व्हिडिओमध्ये चार-पाच जण सोनटक्के यांना काठीने, लोखंडी पाईपने मारहाण करत असून त्यानंतर काही लोक हे भांडण सोडवण्यासाठी आल्याचे दिसत आहे.

सोनटक्के यांचे शेटफळ येथे लॉन्ड्री व गाडी पंक्चरचे दुकान आहे. कृष्णा महादेव सोनटके (वय ३०) यांनी या प्रकरणात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव गुंड, नवनाथ रामा गुंड (सर्व रा. शेटफळ ना) या संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार सेक्शन ३२३, ३२४,३२६,३४, ५०४, ५०६ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, १५ दिवसांपूर्वी सोनटक्के व अमोल गुंड यांच्यात कपडे ईस्त्री करून घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी मी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. दि.२६ डिसेंबर ला सकाळी साडे आठ च्या सुमारास अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव गुंड, नवनाथ रामा गुंड हे सर्वजण माझ्या दुकानात आले व आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का करतो असे म्हणून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. माझी पत्नी प्रियंका भांडण सोडवण्यासाठी आली असता तिलाही यावेळी मारहाण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!