करमाळा येथील बंधन बँकेत पुन्हा एकदा आर्थिक घोटाळा – ३४ लाखांचा अपहार उघड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – बंधन बँकेच्या करमाळा शाखेत ११४ कर्जदारांच्या कर्जाच्या पैशातून ३४ लाखांचा अपहार झाला असून या प्रकरणी मॅनेजर, कॅशिअर व इतर १ महिले विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बंधन बॅकेचे औरंगाबाद येथील विभागीय व्यवस्थापक मयूर भास्कर निखार यांनी या अपहाराची माहिती घेऊन काल (दि.७) फिर्याद नोंदविली आहे.
२०२१ मध्ये २ कोटी १० लाखांचा घोटाळा उघड – या आधीही करमाळा येथील याच ‘बंधन’ बँकेत फेब्रुवारी २०२१ मध्ये दोन कोटी दहा लाख रुपयांचा अपहार झालेला होता. बँकेतील तत्कालीन मॅनेजर राहुल मुंडे यांनी काही ग्राहकाशी संपर्क साधून व संगणमत करून दोन कोटी 10 लाख रूपयांची अफरातफर केली होती. यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरवातीला श्री.मुंडे फरार होता. फेब्रुवारी 2022 मध्ये पोलीसांकडून त्याला अटक झाली होती. जुलै २०२३ मध्ये मुंडेंना जामीन मंजूर झाला.
याविषयी अधिक माहिती अशी की, एप्रिल 2023 ते जुन 2023 दरम्यान करमाळा येथील बंधन बँकेतून एकुण 114 कर्जदारांना 50,30,000 रूपये रक्कम मंजुर केली. त्यापैकी बँक रेकॉर्डनुसार कर्जदारांच्या खात्यावर डिपॉजीट म्हणुन 2,32,000 रूपये ( प्रत्येक कर्जदारांच्या कर्जातून 1000 रूपये ते 3000 रूपये रक्कम डिपॉझिट साठी कपात करून) ठेवुन त्यांना 13,83,000 रूपये दिले. मंजुर कर्जातील कर्जदार यांना 34,15,000 रूपये न देता स्वत:च्या आर्थिक फायद्या करीता वापर करून त्याचप्रमाणे कर्जदार यांना कर्ज मंजुर करते वेळी नियम बाहय कर्ज मंजूर करून बॅकेचे नियमांचे उल्लघंन करून बॅकेची दिशाभुल केल्याबद्दल बंधन बँक करमाळा ब्रँच मॅनेजर सूजित बिश्वास, कॅशिअर शेख व कर्जत (जि.अहमदनगर) येथील एक महिला अशा तिघांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही काही सिस्टी कर्जदारांना फोन वरून तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली असता त्यांनी असे सांगितले की, बंधन बँकेतून आम्हाला साधारण ४० हजार ते ४५ हजार रू रक्कम कर्ज म्हणून मंजूर झाली. त्यापैकी बँकेतून ४० हजार रुपये कर्ज वाल्यांना ८ हजार रुपये तर ४५ हजार रुपये कर्ज वाल्यांना १३ हजार रुपये रक्कम कर्ज रक्कम म्हणून दिली व उर्वरित रक्कम नंतर दिलीच नाही. त्यावेळी आम्ही सिस्टी कर्जदारांची यादी काढली असता असे ११४ कर्जदार दिसून आले.
बंधन बॅकेचे प्रदेश व्यवस्थापक अनूपम चक्रवर्ती यांनी सदर आर्थिक फसवणूक अनूषंगाने करमाळा येथील बंधन बँक व्यवस्थापक सूजित विश्वास यांना विचारणा केली असता त्यांनी लिहून दिले की , मी अधिकार क्षेत्रात नसताना सूध्दा 30,000 / -रू पेक्षा जास्त कर्ज दिले आहे , तसेच कर्जदार यांना कर्ज रक्कम ही बॅकेत सी . सी . टी . व्ही निगराणीतच देणे आवश्यक असताना ती फिल्ड मध्ये दिली आहे . कर्जदार यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज अनुषंगाने कागदपत्रे ( पासबूक , लोनकार्ड , लोन सॅन्क्शन कॉपी ) दिलेली नाही, मी अधिकार क्षेत्राचे लोकांना कोणत्याही प्रकारची खात्री न करता कर्ज रक्कम मंजूर केली आहे . कर्जदार यांना लोन मिळाल्या नंतर कॅशियर शेख यांनी टेलिव्हीजन व्हेरिफिकेशन करणे जरुरीचे असताना कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन केले नाही , तसेच ज्या दिवशी कर्ज रक्कम मंजूर झाली त्याच दिवशी कॅश विड्राल होणे आवश्यक असताना ते नंतरच्या तारखेला दिले गेले असे बंगाली भाषेत दिनांक 28/7/2023 रोजी स्वाक्षरात लिहून दिले आहे .
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मिठु जगदाळे हे करत आहेत.
संबंधित बातमी : करमाळ्यातील दोन कोटी दहा लाखाच्या अपहार प्रकरणातील एकास अटकपूर्व जामीन मंजूर