एजंटद्वारा लावलेल्या लग्नानंतर मुली पसार – करमाळा तालुक्यातील दोन कुटुंबांची फसवणूक
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : एजंटच्या मदतीने लावलेल्या लग्नानंतर विवाहित मुली बेपत्ता झाल्याच्या नुकत्याच दोन घटना करमाळा तालुक्यामध्ये घडल्या आहेत. यामध्ये एक मुलगी लग्न झाल्याच्याच दिवशी पळून गेली आहे तर दुसरी मुलगी लग्नाच्या नऊ दिवसानंतर पळून गेली आहे.
मधल्या काळामध्ये मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या मुलांच्या लग्नासाठी सहजासहजी मुलगी मिळत नाहीत. नोकरी, संपत्ती, शहरात वास्तव्य अशा अपेक्षांमुळे ग्रामीण भागातील बेरोजगार अथवा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे.
सर्व प्रयत्न संपल्यानंतर असे अनेक कुटुंब लग्न जुळवून देणाऱ्या एजंट लोकांच्या माध्यमातून लग्न जुळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
अशाच प्रकारे करमाळा तालुक्यातील मांजरगाव व चिखलठाण क्रमांक एक अशा दोन गावातील दोन तरुणांची लग्न झाले आहे व त्या दोन्ही परिवाराची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये तेच एजंट आहेत. सुरवातीला मांजरगाव व चिखलठाण क्र. १ येथील परिवाराने शिरसवडी (ता. इंदापूर) येथील एका पुरूष एजंट कडे लग्नासाठी मुलीची मागणी केली होती. या एजंटने परभणी येथील एका महिला एजंट मार्फत ही दोन लग्ने लावून दिली आहेत.
मांजर गाव येथील तरुणाशी लग्न केलेली मुलगी लग्न झाल्या दिवशीच येताना तुळजापूर मंदिरातून पसार झाली तर चिखलठाण एक येथील तरुणाशी लग्न झालेली मुलगी लग्नाच्या नवव्या दिवशी रात्री १२:३० च्या आसपास पळून गेली. या दोन्ही कुटुंबाने फसवणुकीचे गुन्हे पोलिस स्टेशनमध्ये दाखल केले आहेत.
मांजरगाव कुटुंबाने तुळजापूर येथे गुन्हा दाखल केला तर चिखलठाण कुटुंबाने करमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.लग्न जमविण्याआधी मुलीचे दिलेले आधारकार्ड, शाळेचा दाखला इ गोष्टी फसवणूकीनंतर नातेवाईकांनी तपासल्या असता त्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले.
करमाळा पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून जेव्हा परभणीच्या एजंटला फोन केला तेव्हा ती मुलगी इकडे आली असून नवरा मुलगा आमचे फोन उचलत नाही त्यामुळे मुलीला भीती वाटल्याने ती निघून आली असल्याचे कारण दिले. दसऱ्याच्या नंतर मी मुलीला घेऊन येते असे सांगितले. पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.
एजंट लोक लग्न जुळवून देण्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख रुपये घेत आहेत.दोन्ही प्रकरणामध्ये मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांनी उसणे, उचल गोळा करून पैसे जमा केले होते.
एजंटच्या पैशा शिवाय, मुलीला दागिन्यासाठी ५०-६० हजार, लग्नाचा बाकी खर्च, परभणीला जाणे येणे प्रवास असे मिळुन तीन- सव्वा तीन लाख खर्च केले आहेत. त्यामुळे झालेल्या फसवणूकीनंतर या कुटुंबाला जबरदस्त मानसिक व आर्थिक धक्का बसला आहे.फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नातेवाईक करत आहेत.