नेरले येथून पावणेसात लाखाची चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : नेरले (ता.करमाळा) येथून घरात ठेवलेल्या पावणेसात लाख रूपये सोन्याच्या वस्तूची चोरी झाले आहे. हा प्रकार १५ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान घडला आहे.
या प्रकरणी विश्वास गोवर्धन काळे यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की.. मी रोपळे (ता. माढा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून काम करत असून माझी पत्नी ही देखील आरोग्यसेविका आहे. आमचे नेरले येथे घर असून येथील रहिवाशी असलेले सतीश अंधारे (वय-२२) हा आमच्याकडे काम करतो. १ ऑगस्ट रोजी माझी पत्नी पुणे येथे ट्रेनिंगसाठी गेली.
त्यानंतर मी माझ्या पत्नीचे दागिणे १५ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता नेरले येथील घरातील कपाटात लॉक करून ठेवले होते व त्या कपाटाची चावी घरातच होती. २१ ऑक्टोबर रोजी माझी पत्नी ट्रेनिंगवरून आल्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी दिवाळी सणासाठी दागिणे घालण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजता कपाट उघडून पाहिले असता त्यात दागिणे दिसले नाहीत.
आम्ही सर्वत्र पाहिले असता दागिणे आढळून आले नाही. त्यानंतर आमचे येथे काम करणारा सतीश अंधारे यास दागिण्याबाबत चौकशी केली असता तो घाबरलेला दिसला. तसेच त्याच्या वागणुकीत आम्हाला बदल जाणवला. त्यामुळे आमची खात्री पटली की.. आम्ही कपाटात ठेवलेले दागिणे यानेच पळवून नेले आहे.
आम्ही कपाटत ठेवलेल्या दागिण्यामध्ये दोन लाखाचे सोन्याचे गंठन, सव्वालाखाचे लहान गंठन, एक लाखाचे दोन तोळ्याचे सोन्याचा नेकलेस, दीड लाखाचे पिळ्याच्या वेगवेगळ्या अंगठ्या, एक लाखाचे कानातील चार फुले, झुबे व साखळी असा एकूण पावणेसात लाख रूपयाचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी सतीश अंधारे विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.