निंभोरे येथे भरदिवसा साडे चार लाखांची चोरी

केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : निंभोरे (ता.करमाळा) येथील शिंदे वस्तीवर भरदिवसा चोरट्यांनी घर साफ करून रोख ८५ हजार ७०० रूपये व ३ लाख ६२ हजार रू.चे दागिने चोरट्यांनी लंपास केले. एकूण ४ लाख ४७ हजार ७०० रुपयांची चोरी झाली आहे. या घटनेमुळे निंभोरे येथील वाड्या वस्त्यावर घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबतची माहिती अशी की, निंभोरे येथील शेतकरी तुकाराम नवनाथ शिंदे रा.निंभोरे व त्यांची पत्नी मनिषा शिंदे हे दाम्पत्य शुक्रवार दि २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. घराला कुलूप लावून शेतात काम करण्यास गेले होते. दुपारी जेवणासाठी घरी आले असता, चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटातील रोख पैसे व दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यामध्ये कपाटातील अर्ध्या तोळयाच्या सहा अंगठ्या, एक तोळयाचे दोन गंठण, सव्वा तोळयाची बोरमाळ, सव्वा तोळयाचे दोन नेकलेस व तीन ग्रॅमची कर्णफुले असे
३ लाख ६२ हजाररू चे दागिने याबरोबरच रोख ८५ हजार ७०० रूपये लंपास केले. या प्रकरणी करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.