शेतीसाठी पूरक पण परिपूर्ण व्यवसायाची गरज! - Saptahik Sandesh

शेतीसाठी पूरक पण परिपूर्ण व्यवसायाची गरज!

साप्ताहिक संदेश अग्रलेख

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेकांनी अनेक उपाय सुचवले आहेत. काहींनी शेतीतील पीकपध्दतीत बदल सुचवले, तर काहींनी फळबागावर लक्ष केंद्रीत करण्याला तर काहीनी पॉलीहाऊस, शेडनेट शेती, निसर्ग शेती (सेंद्रीय शेती), फुलांची शेती, केळी, ऊस शेती असे एक ना अनेक पीकात बदल सुचवले आहेत. तर काहीनी शेतीपुरक उद्योग सुचवले आहेत. त्यामध्ये कृषी पर्यटन, शेतीमालावरील प्रक्रिया साखर निर्मिती, गुळ निर्मिती, लिंबूवर प्रक्रिया, डाळींब, ज्युस, केळी वेफर्स तर काहीजण मत्स्यशेती, गांडुळखत निर्मिती, मधुमक्षीका पालन, मशरूम शेती, शेळी पालन, कुक्कुट पालन, दुध व्यवसाय, तेल घाणे, मिरची पावडर, मशाला उत्पादन, गव्हाचा आटा, मैदा, शेवया, कुरडया, दाळ मील, भाजीपाला विक्री, पापड, लोणचे उत्पादन, आवळा ज्युस, कॅन्डी, मक्यापासून स्टार्च उत्पादन, (रोपवाटीका) असे एक ना अनेक उद्योग सुचवले आहेत. पण तरीही शेतकऱ्याचे उद्योग काही यशस्वी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती खुंटली आहे.

करमाळा तालुक्याचा विचार करता उजनीला अपवाद वगळता प्रतीवर्षी पाणी येते व त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. कुकडी धरण, कोळगाव प्रकल्प, मांगी मध्यम प्रकल्प हे तलाव कधीतरी सुदैवाने भरतात. ते जर पाण्याने भरले तर तालुका शंभर टक्के बागायत होऊ शकतो. पण निसर्ग कोणाच्या ताब्यात आहे का..? कधी पाऊस पडतो तर कधी पाऊसच पडत नाही. पण आहे त्यामध्ये मार्ग काढणे हे मानवाचे वेगळेपण आहे. तोच माणूस खरा विकास करू शकतो. त्यातल्या त्यात तालुक्याच्या विकासासाठी उजनी धरण हे तसे महत्वाचे साधन आहे. कितीही अडचण असलीतरी उजनीच्या टप्यात फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. खूपच पाणी टंचाई जाणवली तरी किमान जनावरांना चारा उत्पादीत करता येईल, एवढे पाणी उपलब्ध होवू शकते.

या दृष्टीने वरील व्यवसायापैकी या भागात दुभती जनावरे पाळून दुधाचा व्यवसाय चांगला करता येवू शकेल. आज जरी दुधाला भाव कमी असलातरी हीच स्थिती कायम रहात नसते. या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात जनावरांचे शेड, धारा काढण्यासाठी यंत्र, कुट्टी यंत्र, जनावरांचा चारा सेंटर, पशुखाद्य उत्पादन, दूध शीतकरण केंद्र व दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहू शकतात. चार-दोन गायीम्हैशी घेऊन डेअरीला दूध घालणे म्हणजे दुध व्यवसाय ही संकल्पना बदलण्याची गरज आहे. दुध व्यवसाय करण्यासाठी किमान २०० ते २५० गायी, म्हैशी व त्यांचे शेड आवश्यक आहे.

कमी कामगारात जास्त जनावरांची जोपासना, खाद्याचा पुरेपूर वापर, शेणखताचे नियोजन, त्यातून गॅस निर्मिती, जनावरांची योग्य देखभाल करून जास्त दुध उत्पादन व उत्पादीत झालेल्या दुधाला जास्त भाव मिळण्यासाठी दुधाचे उपपदार्थ निर्माण करणे, याबाबी या व्यवसायात महत्वाच्या ठरतात.

दुध व्यवसाय हा पुर्ण वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. आपण पाहिले, की कोरोना काळातही दुध व्यवसायाला विशेष महत्व होते. विशेष म्हणजे हा व्यवसाय कोठेही करता येतो. त्यासाठी अशीच जमीन पाहिजे, असेच ठिकाण पाहिजे असे काही नाही. दुध व्यवसायामुळे शेतीला खत मिळते, देशी गाईचा गोठा असेलतर त्याचे गोमुत्र शेती व आरोग्यासाठी वापरले जाते. गाईच्या शेणापासून अनेक वस्तु बनवल्या जातात. गोवरी पासून ते पणत्या पर्यंत व गळ्यातील माळेपासून ते गणपती पर्यंत अनेक वस्तु बनवल्या जातात व त्या चांगल्या भावाने विकल्या जातात. गोमुत्र व शेण यापासून विविध औषधे बनवली जातात. दुध व्यवसाय हा देशातील मुख्य व्यवसाय मानला जातो. कारण हा व्यवसाय सुशिक्षित व अशिक्षित अशा दोघांनाही सामावून घेणारा व्यवसाय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत दुध व्यवसायाला फार महत्व आहे. पण हा व्यवसाय एकट्या दुकट्यावर अवलंबून नाही. त्यासाठी वेगवेगळ्या मित्रांनी एकत्रित येवून वेगवेगळे विभाग उभे केले पाहिजेत किंवा वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले पाहिजे. एकाने चारा उत्पादन व संकलन केले पाहिजे. दुरुऱ्याने पशुखाद्य निर्माण केले पाहिजे. तिसऱ्याने जनावरांची जोपासना, चौथ्याने दुधाचे शीतकरण व संकलन केले पाहिजे. पाचव्याने दुधावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले पाहिजे. यातून वाहतूकदारांनाही व्यवसाय मिळू शकतो. दुधापासून पनीर, खावा, मावा, लोणी, दही, तुप, ताक, असे पदार्थ बनवले जातात. याशिवाय स्वीट मार्टमधील पेढ्यापासून ते बर्फी पर्यंत अनेक पदार्थ बनवले जातात.

आधुनिक पध्दतीने दुध व्यवसाय केल्यास त्यामध्ये प्रचंड नफा आहे. पण या व्यवसायासाठी कठोर परिश्रम, सातत्य, चिकाटी व जिद्द असावी लागते. कधी यशअपयश ठरलेले असते. तरीही जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन, मुरघास, हायड्रोफोनीक चारा तसेच आजारपणावरील उपचाराचे नियोजन आवश्यक आहे. वर्षभर सारखे किंवा जवळपास दुध कसे मिळेल याचे नियोजन करावे लागते. दुध शितकरण प्रक्रिया महत्वाची असते. केवळ दुध विक्री करून दुधाचा व्यवसाय परवडत नाही तर दुधाचे उपपदार्थ बनवले तरच दुध परवडते. पहा गावात दुध ३० ते ४० रूपये लिटर जाते व शहरात हॉटेलमध्ये ताक ३० रूपये पावशेर जाते. हा फरक जोपर्यंत शेतकरी समजून घेणार नाहीत तो पर्यंत दुध धंदा परवडणार नाही. विशेष म्हणजे या व्यवसायात अनुभवी माणसाची खूप गरज असते. गाई भाकड राहण्याचा काळ वाढला तर व्यवसाय तोट्यात जाणार हे ठरलेले आहेच.

गाई-म्हशीच्या गोठ्याच्या खर्चापेक्षा त्यांना चारा पुरेशा व रहण्याची योग्य सोय असेलतर चालते. या व्यवसायात फसवणाऱ्याची संख्या मोठी असते. गाई किंवा म्हैस खरेदी करताना (जरशी-होलस्टेन फ्रिजन नव्हे) व्यापारी फसवतात. शक्यतो कमी दुधाच्या, लागू न होणाऱ्या, अंग बाहेर पडणाऱ्या जनावरांची विक्री केली जाते.

खरंतर घरीच जर जातीवंत जनावरांची निर्मीती केली तरच हा व्यवसाय फायद्यात पडतो. पशुखाद्य हा एक दुध व्यवसायातील महत्वाचा भाग आहे. अनेक कंपन्या या पशुखाद्यामध्ये युरीया, गव्हाचे भुस्कट, सरकीचे भुस्कट वापरतात. याचा जनावरांना तात्पुर्ता लाभ व कायमचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे स्वतःच खुराक बनवलेतर ते फायद्याचे व स्वस्तात पडते. जागतीक पातळीवर विचार केलातर इस्त्राईलचा दुध व्यवसाय अनुकरणीय आहे. तेथील एक गाय एका वेतामागे ११ हजार लिटर दुध देते तर आपली २५०० ते ३००० लिटर दुध देते.

इस्त्राईलमध्ये एक परिवार दोन ते तीन हजार गायींना सांभाळून दुध व्यवसाय करतात. ब्राझील मध्ये तर आपल्या देशी गाईचे ब्रीड असे आहे, की तेथे एकावेळेला देशी गाई २५ ते ३५ लिटर दुध सहज देतात. या देशात १९२१ डेअरी व २० लाख गाई आहेत. तेथे ३ टक्के दुध उत्पादन होते. जगात सर्वात जास्त दुध उत्पादन करणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे. जगातील उत्पादीत दुधात आपण २२ टक्के दुध उत्पादन करतो. जर आपण अधीक काळजीपूर्वक व्यवसाय केलातर जगात आपण फार पुढे जावू. भारतानंतर अमेरीका, चीन, पाकीस्तान व ब्राझील यांचा क्रमांक लागतो.

थोडक्यात दुध व्यवसायाला आपली भूमी ही लाभदायक आहे. वातावरण व चारा उत्पादन येथे चांगले आहे. येथे चारा विकत घेऊन सुध्दा दुध व्यवसाय केला जातो. चारा सहज व स्वस्त उपलब्ध होणारा हा भाग असल्यामुळे दुध व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. सध्या दुधाला मिळणारा भाव हा कमी आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासठी दुध दुध संकलन केंद्रवर विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करणे किंवा स्वतः दुध विकणे हा पर्याय महत्वाचा आहे. एकंदरीत शेती पुरक व्यवरुयात दुधाला पहिले प्राधान्य मिळू शकते, त्यावर लक्ष देण्याची व सर्वस्व झोकून काम करण्याची गरज आहे. शासन ही या व्यवसायाला प्राधान्य देत आहे. त्याचा फायदा उठवून आपण प्रगती केली पाहिजे. बस्स..!

✍️डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, मो.९४२३३३७४८०

A complementary but perfect business need for farming | saptahik sandesh agralekh | Sampadakiy | Karmala | साप्ताहिक संदेश संपादकीय | अग्रलेख

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!