९ वर्षांनंतर 'सैराट' आजपासून पुन्हा प्रदर्शित! -

९ वर्षांनंतर ‘सैराट’ आजपासून पुन्हा प्रदर्शित!

0
करमाळा शहरातील गायकवाड चौकामध्ये या चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आलेले आहे

करमाळा(सूरज हिरडे) : नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. २०१६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, अजय -अतुल यांच्या अप्रतिम संगीताने हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता.

या चित्रपटाची प्रेरणा घेऊन ५ विविध भाषेमध्ये त्याचे रिमेक बनवण्यात आले. कन्नडमध्ये मनसू मल्लीगे(२०१७), ओडिया मध्ये लैला ओ लैला (२०१७), पंजाबी मध्ये चन्ना मेरेया (२०१७), बंगाली मध्ये नूर जहाँ (२०१८) अशा विविध भाषेमध्ये या चित्रपटाची रिमेक बनवण्यात आलेले आहेत.

२०१६ मध्ये करमाळा येथील सागर थिएटरमध्ये ‘सैराट’ प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांनी केलेली गर्दी.

या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शन यांनी ९ वर्षांनंतर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. आज २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हा चित्रपट अनुभवायला मिळणार आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे आहे.

२०१६ साली प्रदर्शित झालेला सैराट चित्रपट हा करमाळ्याचे सुपुत्र नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटातील बरेचशे चित्रीकरण हे करमाळा तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेले आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील अनेक व्यक्तींना या चित्रपटामध्ये स्थान मिळालेले आहे. सैराट चित्रपटामुळे करमाळ्याला जगात एक वेगळी ओळख मिळाली. त्यामुळे आपल्या मातीत तयार झालेला हा चित्रपट इथल्या नागरिकांना आपलाच चित्रपट असल्याची भावना आहे.

करमाळा येथील छोटू महाराज या सिनेमा टॉकीज मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून दुपारी १२:१५, ३:१५, सायंकाळी ६:१५ व रात्री ९:१५ असे चार शो ठेवले आहेत. हा चित्रपट २१ मार्च ते २७ मार्च या दरम्यान सुरू राहणार असल्याची माहिती थिएटर कडून देण्यात आली.

सुलेखन – प्रशांत खोलासे, केडगाव (ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *