सप्टेंबर उजाडला तरी मांगी प्रकल्पात ११ % टक्के तर कोळगाव प्रकल्पात ३०% पाणीसाठा - Saptahik Sandesh

सप्टेंबर उजाडला तरी मांगी प्रकल्पात ११ % टक्के तर कोळगाव प्रकल्पात ३०% पाणीसाठा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पावसाळा समारोपाकडे जात असताना सप्टेंबर उजडलातरी अद्यापही मांगी तलावात ११.१२ टक्के पाणीसाठा आहे. एका बाजूला उजनी शंभर टक्के भरून जादा साठा होत असताना कोळगाव प्रकल्पात मात्र ३०.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यातील अन्य तलावात त्यामुळे तालुक्यातील ४० टक्के भागातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. करमाळा तालुक्यातील पाटबंधारे विभागांतर्गत एक मध्यम प्रकल्प व १० लघु प्रकल्प असे ११ प्रकल्प आहेत. त्यापैकी फक्त दोन लघुप्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत तर एक लघुप्रकल्प ६० टक्के भरलेला आहे.

विशेष म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही ही स्थिती आहे. करमाळा तालुक्यातील उजनी प्रकल्प शंभर टक्केच्या वरती गेल्यामुळे तालुक्यातील नागरीकातून आनंद व्यक्त केला जात आहे. असे असलेतरी करमाळा तालुक्याच्या पूर्वउत्तर भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कोळगाव प्रकल्पात मात्र अद्यापही ३१ टक्केच्या आतच पाणी आहे. तर दुसऱ्या बाजुला ११ तलावापैकी अवघ्या तीन तलावात पाणी उपलब्ध आहे. आठ तलाव मात्र कोरडेठण आहेत. अशा परिस्थितीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस सप्टेंबर पर्यंत करमाळा तालुक्याचे २९६.२ मि.मी. ही सरासरी आहे. सध्या ४३५.८ मि.मी. म्हणजे १४७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत ३५१.३ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी करमाळा तालुक्यात सर्वात जास्त जेऊर मंडल मध्ये ५४८ मि.मी. म्हणजे १८५ टक्के तर सर्वात कमी केत्तूर मंडल मध्ये ३५०.६ मि.मी. म्हणजे ११८.७ टक्के पाऊस पडला आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडूनही तलाव मात्र कोरडेच ही खरी शोकांतिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!