पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा – सापडलेली रक्कम जमा केली – विद्यार्थ्यांचा सत्कार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आजच्या जगात प्रामाणिकपणा दुरापास्त होत चाललेला आहे, असे म्हटले जाते, परंतु प्रामाणिकपणाशिवायही जग चालत नाही, याचा प्रत्यय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पोथरे (ता.करमाळा) येथील अगदी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांना सापडलेली रक्कम त्यांनी शाळेत जमा केली आहे.
पोथरे गावातील दिलीप शिरगिरे यांचे 30 डिसेंबर रोजी २४००/- हरवले होते. त्यांना ती रक्कम सापडत नव्हती. परंतु पोथरे शाळेतील इ.६ वी चो विद्यार्थी ऋतूराज रमेश शिंदे यास ती रक्कम सापडले. त्याच्या बरोबर चि.प्रतिक संतोष साळुंके हा देखील होता. या दोघांनी ही सापडलेली रक्कम वर्गशिक्षक दत्तात्रय मस्तूद यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी या रकमेच्या मालकाचा शोध घेऊन ती रक्कम दिलीप शिरगिरे यांना सर्व शिक्षकांसमक्ष सुपूर्द केली. या विदयार्थ्यांच्या शा.व्य. समितीचे अध्यक्ष, सर्वसदस्य, सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांनी कौतुक केले, श्री.शिरगिरे यांनी मुलांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा हार घालून सत्कार केला व त्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.