न्यायालयीन कामकाज तसेच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे – न्यायाधीश एम.पी.एखे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२१) : ब्रिटीश आपल्या देशातून निघून गेले, परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचा वापर जास्त करतो, कारण इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय भाषा आहे, तसेच देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, त्याच बरोबर आपली मातृभाषा मराठी आहे, त्यामुळे या दोन भाषा जरी महत्त्वाच्या असल्या तरी आपली मातृभाषा मराठी भाषेचे संवर्धन होणे तितकेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन करमाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम.पी.एखे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व करमाळा तालुका विधी सेवा समिती यांच्या सयूंक्त विद्यमाने करमाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा न्यायालय, सोलापूर येथील न्यायधीश एस.ए.ए.आर औटी यांचे आदेशानुसार करमाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम.पी.एखे, यांचे अध्यक्षतेखाली व सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांचे उपस्थितीत १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने “मराठी भाषा संवर्धन” या विषयावर आज (ता.२१) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी करमाळा न्यायालयाच्या न्यायाधीश एम.पी.एखे यांनी आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन करमाळा न्यायालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रदीप मोहिते यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी.एखे या होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री तसेच वकील संघाचे सचिव ॲड.योगेश शिंपी, जेष्ठ विधिज्ञ ॲड.एन.डी.रोकडे, ॲड.लता पाटील, ॲड.सविता शिंदे, ॲड.एम.डी.कांबळे, ॲड.बी.टि.हिरडे आदीजण उपस्थित होते.
यावेळी प्रा.प्रदीप मोहिते यांनी “मराठी भाषा संवर्धन” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी तालुका वकील संघाचे विधीज्ञ, न्यायालयीन सर्व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर खराडे यांनी केले.

