जेऊर येथील भारत महाविद्यालयात उद्यापासून कर्मयोगी व्याख्यानमाला

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील भारत महाविद्यालयामध्ये दि.13 व 14 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षीप्रमाणे कर्मयोगी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी दिली. या व्याख्यानमालेत गुरुवार दि.13 ऑक्टोबर रोजी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांचे “मागे वळून पाहताना” या विषयावरील व्याख्यान होणार असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. हरिदास डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे व्याख्यान संपन्न होईल.

शुक्रवार दि.14 ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत आणि MPSC चे माजी सदस्य डॉ.अरुण अडसूळ यांचे “आयुष्याला आकार देताना ” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती हे व्याख्यान संपन्न होईल.

ही दोन्ही व्याख्याने सकाळी ९.०० वाजता भारत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न होणार असून या दोन्ही व्याख्यानांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच जेऊर आणि परिसरातील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांनी व रसिक नागरिकांनाही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!