कविता ही काळजाची भाषा – लोककवी प्रशांत मोरे
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘कविता’ ही काळजाची भाषा आहे, ती काळजातून यावी लागते व काळजापर्यंत जावी लागते. जेंव्हा कविता आपल्या आईला आवडते तेंव्हा ती खरी कविता असते. असे मत लोककवी व पार्श्वगायक प्रशांत मोरे यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुका साहित्य मंडळ या संस्थेच्या वतीने यावर्षीचा “बुधभूषण काव्य पुरस्कार” कवी पुनीत मातकर यांच्या “ऐन विणीच्या हंगामात” या काव्यसंग्रहास श्री.मोरे यांचे हस्ते देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ” विजयश्री” सभागृहात समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील हे होते.
पुढे बोलताना लोककवी, सिनेपार्श्वगायक, संगीतकार प्रशांत मोरे म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे हे महान लेखक होते. त्यांच्या “बुधभूषण” ग्रंथाच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत आहे. ही छ. संभाजीमहाराजा बद्दलची कतृज्ञता आहे व ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. यावेळी लोककवी प्रशांत मोरे यांनी त्यांच्या कविता आणि गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी उपस्थितांचे स्वागत तालुका साहित्य मंचाचे अध्यक्ष कवी प्रकाश लावंड, मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य नागेश माने, कवी दीपक लांडगे, विवेक येवले, कवी खलील शेख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ खरात यांनी केले.
यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड,उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , संत साहित्याचेअभ्यासक डाॅ. ॲड.बाबूराव हिरडे, मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे , माजी मुख्याध्यापक एन.डी. सुरवसे, श्री.गायकवाड, दिगंबर साळुंके आदीजण होते.
यावेळी कवी पुनीत मातकर यांना पहिला बुधभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यात रोख 5000रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कार वितरणानंतर श्री.मातकर यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले तर कवी दिपक लांडगे यांनी आपली कविता यावेळी सादर केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा तालुका साहित्य मंडळ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9:30 ते 11:00 यादरम्यान भव्य “ग्रंथदिंडी” काढण्यात आली होती. त्यानंतर 11:00 ते 1:00 यादरम्यान गझल मुशायरा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे हे होते तर कवी वैभव कुलकर्णी, पंढरपूर, बबन धुमाळ, दौंड, प्रसन्नकुमार धुमाळ, तुषार बारंगुळे, दीपक लांडगे, प्रिया कौलवार,विजय खाडे,नवनाथ खरात,कालिदास चौडेकर,डॉ.सुनीता दोशी,डॉ.राजेंद्र केंगार यांच्यासह महाविद्यालयीन व स्थानिक कवी, कवयित्री सहभागी झाले होते.या कवीसंमेलनाचे सुत्रसंचालनं निलोफर फनिबंध (अक्कलकोट) यांनी केले तर कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवी, गजलकार खलीलभई शेख यांनी केले.