शेळकेवस्तीची शाळा ही सर्वधर्मसमभावाचे संस्कार करणारी शाळा – प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा(दि.२०) : जि.प. शेळेकेवस्ती शाळा ही सर्वधर्मसमभावाचे संस्कार करणारी शाळा असल्याचे प्रतिपादन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळके वस्ती (दहिगाव) मंगळवार दि. १८ मार्च वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.करे पाटील बोलत होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, निकोप समाज बांधणीसाठी शिक्षक व शाळांची भूमिका महत्वाची असून संविधान मूल्य जोपासण्याचे संस्कार ग्रामीण भागातील शिक्षक विशेषत्वाने करत आहेत हे अभिमानास्पद आहे. विविध धर्म, जाती, पंथांपेक्षा श्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता असून बालमनावर हा संस्कार करण्याचे महत्कार्य शिक्षकच करू शकतात असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रा.करे पाटील यांनी शाळेला अत्याधुनिक झेरॉक्स प्रिंटर मशीन भेट देऊन वेळोवेळी शाळेला मदत करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले. वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक लोकगीते, कालभैरवाष्टक, विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा. गणेश करे-पाटील, दहीगावच्या सरपंच प्रियांकाताई गलांडे, उपसरपंच नितीन नरुटे, वि.का.सो.चेअरमन हरिश्चंद्र शेळके, इंग्लिश टिचर्सचे जिल्हा अध्यक्ष. प्रा बाळकृष्ण लावंड, प्रा जयेश पवार, प्रा विष्णू शिंदे सकाळचे पत्रकार गजेंद्र पोळ ,जेष्ठ निवृत्त शिक्षक गायकवाड गुरुजी,शा.व्य.समिती अध्यक्ष ज्योतिराम पाडुळे, उपाध्यक्ष महादेव शेंडगे, मा. अध्यक्ष बापू कोंडलकर,रवी पाडुळे,महेश शेळके,विनायक महाराज पाडुळे, नानासाहेब गलांडे, महादेव कोंडलकर ,विठ्ठल पाडुळे, योगेश वाघमोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक दस्तगीर शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल जाधव यांनी केले तर सहशिक्षक विजयकुमार राऊत यांनी आभार व्यक्त केले.
बहुसंख्य उपस्थितानी सहभागी कलाकार विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन कौतुक केले.





