सामाजिक कार्याची दखल; अल्लाउद्दीन शेख यांचा कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात सन्मान

करमाळा संदेश प्रतिनिधी :
करमाळा शहरातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवा नेते तथा मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख (अल्लू शेठ) यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात त्यांना आभारपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अल्लाउद्दीन शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत आहेत. वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान, विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे ज्योत नेणे तसेच गरजू आणि गोरगरीब नागरिकांना वेळोवेळी आर्थिक मदत करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात अल्लाउद्दीन शेख यांच्यासह मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे मजहर शेख व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजहितासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या अल्लाउद्दीन शेख यांच्या या कार्याची दखल घेत विद्यालयाच्या वतीने त्यांना आभारपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विविध स्तरांतून कौतुक होत असून, विद्यालयाने केलेला हा सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली प्रेरणादायी पावती मानली जात आहे.





