
मो.नं. 9665667877
करमाळा: एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असताना स्वतःचे छंद जोपासणे, शेती करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेणे आणि त्याचबरोबर समाजामध्ये विधायक विचारांचा प्रसार करणे, हे सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, हे शक्य करून दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने!

एक व्यक्ती विविध क्षेत्रांत योगदान देऊ शकते का? तर त्याचे उत्तर म्हणजे नागेश माने सर होय. ते सारंगी, माऊथ ऑर्गन, बासरी, बुलबुल आणि हार्मोनियम वाजवतात. एवढेच नव्हे तर हलगी वादनही दमदारपणे करतात. संगीत हा त्यांच्या जीवनातील केवळ छंद नसून एक ऊर्जा देणारा प्रवाह आहे. एवढेच नव्हेतर बुद्धिबळ आणि टेबल टेनिस यांसारख्या खेळांमध्ये आजही त्यांचा विशेष उत्साह आहे. छंद आणि उत्साहाला वयाचे बंधन नसते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
माने सरांना अनेकजण बापू म्हणून ओळखतात. बापूचे शिक्षण करमाळा येथील शाळा क्रमांक २ मध्ये चौथीपर्यंत,पाचवी ते अकरावी महात्मा गांधी विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पुर्ण झाले. त्यानंतर कोल्हापूर येथून शिवाजी विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केली.
ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा करण्याचा आणि पुढे त्याच संस्थेचे प्राचार्य म्हणून निवृत्त होण्याचा अनोखा योग त्यांच्या जीवनात आला आहे.

सन
१९८२ मध्ये त्यांचे एम.ए. झाल्यानंतर त्यांनी जगदंबा कारखान्यावर क्लार्क म्हणून अवघ्या दहा रुपये रोजाने नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर रोहा येथे सीनियर कॉलेजमध्ये एक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले. सन १९८५ मध्ये कै. नामदेवराव जगताप यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली.
सन २०१८ पर्यंत त्यांनी याच संस्थेत प्राध्यापक आणि पुढे प्राचार्य म्हणून सेवा बजावली. महाविद्यालयात ते अर्थशास्त्र हा कठीण विषय शिकवत होते, पण वर्गात त्यांना पुस्तकाचा कधी आधार घ्यावा लागला नाही, एवढे त्यांचे त्या विषयावर प्रभुत्व होते.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बार्शी येथील एम.ए. च्या विद्यार्थांनाही त्यांनी काही काळ हा विषय शिकवला आहे.
याबरोबरच
करमाळा तालुका मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून मोफत वधू-वर सूचक मंडळ चालवून त्यांनी अनेक कुटुंबांना एकत्र आणण्याचे सामाजिक कार्य केले आहे. या माध्यमातून आतापर्यंत तीन वेळा वधू-वर मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत.
माने बापूंचे वृक्षप्रेम विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या परिसरात गणेशनगर, कृष्णाजीनगर आदी ठिकाणी नागरिकांना रोपे उपलब्ध करून देत वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले आहे. राखवाडी, रावगाव, देवराई ग्रुप, शनैश्वर दिंडी अशा विविध ठिकाणीही वृक्षलागवडीसाठी त्यांनी योगदान दिले आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश केवळ देण्याऐवजी तो प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.मराठा सेवा संघाचे दोन वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
जिजाऊ ब्रिगेडचेही त्यांनी कार्य केले आहे. संतांच्या जयंती-पुण्यतिथी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम तसेच दिंडी सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन त्यांनी समाजजागृतीचे कार्य सुरू ठेवले आहे.

माने बापूंचे वडील कै. महारुद्र माने (मामा) हे धाडसी, कडक आणि स्पष्टवक्ते होते. कै. अण्णासाहेब जगताप यांचे ते शेवटपर्यंत सहकारी होते. त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणूनही काम केले.आई निलवती या गृहिणी होत्या.
त्यांचे बंधू दत्तात्रय माने हे भारत हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक असून बहीण सौ.शशिकला गजेंद्र गुठाळ या देखील सेवानिवृत्त शिक्षिका आहेत.
१९८६ मध्ये वाटेफळ, ता. परांडा येथील कै.इंद्रभान मोहिते यांची कन्या जयश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा ‘वैभव’ हा मुलगा पदवीधर असून तो व्यवसाय करतो, तर मुलगी सौ.गौरी संकेत सावंत ही एम.बी.ए. असून आपल्या संसारात सुखी आहे.
स्वतःची शेती सांभाळत सामाजिक कार्याची वाटचाल सुरू ठेवणाऱ्या माने बापुंचे कार्य आजही अविरत सुरू आहे. समाजातील चुकीच्या प्रथा आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठविणे, वृक्षसंवर्धन करणे आणि संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हे त्यांच्या आगामी कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शिक्षक म्हणून ज्ञानदान, प्राचार्य म्हणून नेतृत्व, कलाकार म्हणून छंदोपासना, शेतकरी म्हणून मातीतला सन्मान, समाजसेवक म्हणून सामाजिक बांधिलकी आणि कार्यकर्ता म्हणून सततची धडपड…
या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे नागेश माने बापू..!
अशा या बहुआयामी अवलियाचा १९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
ॲड.डॉ.बाबूराव हिरडे,
करमाळा.मो.न 9011355389
