मनोहर भोसले प्रकरणात दत्तकला इन्स्टिट्यूटच्या सचिवास पोलिस कोठडी- तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. १७ : मनोहर भोसले प्रकरणात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, दत्तकला इन्स्टिट्यूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे येथील संस्थेशी संबंधित पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले यास प्राप्त झालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यामध्ये सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कुर्डूवाडी पोलिस ठाणे गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम ३(२), ३(३) आणि वाढीव बीएनएस कलम १११(२) अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी सोलापूर ग्रामीण घटकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाने आतापर्यंत गुन्ह्यात सहभागी असलेले एकूण २४ आरोपी निष्पन्न केले आहेत.

दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले यास प्राप्त झालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना मदत करणारे संस्थेतील आरोपी राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिंगाडे यांना ११ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर संस्थेच्या महिला सचिव यांनाही १३ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली.
या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज(ता.१७)न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्यासाठी पोलिसांनी पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिस कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील दत्तकला संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ हे फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. त्याचा शोध सुरू असून, मनोहर भोसले प्रकरणातील पुढील तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे.

