शाळेची विद्यार्थीनी झाली एक दिवसाची सरपंच – राजुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील ग्रामपंचायत सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाचे औचित्य साधून राजुरी ग्रामपंचायतने विद्यार्थिनीची सरपंच पदावर एक दिवसासाठी निवड केली.
राजुरी गावचे विद्यमान सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी एक दिवसाचा विद्यार्थी सरपंच म्हणूनआज सकाळी ११ वाजता राजुरी ग्रामपंचायत मध्ये श्री.राजेश्वर विद्यालय राजुरी येथील कुमारी स्नेहल नागनाथ गरुड यांची निवड केली.
एक आदर्श गावाची निर्मिती कशी असावी? गावातील लोकांच्या समस्या कशा प्रकारे जाणून घ्याव्यात? त्याचबरोबर गावातील सद्यस्थितीतील असणाऱ्या समस्या वर उपाय कशाप्रकारे करावेत? याबद्दल एक दिवसाचे सरपंच स्नेहल गरुड यांनी स्वतःचे विचार व्यक्त केले. विद्यार्थिनीची सरपंच पदावर नियुक्ती करून राजुरी गावाने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी श्री.राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल सोपान झोळ,सरपंच डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी चे मुख्याध्यापक संतोष शितोळे, ग्रामसेवक गलांडे भाऊसाहेब, मारुती साखरे, अमोल कोल्हे, तुळशीराम जगदाळे, कल्याण बागडे, नवनाथ दुरंदे, राजुरी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.