मुंबई पोलीस दलातील मुस्कानची निवड मुलींसाठी प्रेरणादायी – स्वातीताई फंड

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा येथील मुस्कान रिझवान गफूर राज हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मुंबई शहर पोलीस दलात निवड मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिचे यश आजच्या तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत नगरसेविका स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले.

गंवडी गल्ली येथील मुस्कान राज हिचा सत्कार स्वातीताई फंड आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव (आण्णा) फंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना स्वातीताई फंड म्हणाल्या की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे मुस्कानने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. तिच्या यशामुळे करमाळा परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुस्कान ही गफूर राज आणि रिझवाना राज यांची कन्या असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित आहे. वडील गफूर राज हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रिझवाना राज या गृहिणी असून इतरांच्या घरी स्वयंपाकाची कामे करून कुटुंबाला हातभार लावतात. अशा परिस्थितीतही पालकांनी तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
मुस्कानचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका प्राथमिक मुलींच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कन्या शाळेत पूर्ण करून तिने अकरावी व प्रथम वर्षाचे शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. शिक्षणासोबतच तिने पोलीस भरतीची तयारी सातत्याने सुरू ठेवली.
पोलीस भरतीसाठी तिने करमाळा येथील युनिव्हर्सल अकॅडमी तसेच जेऊर येथील योद्धा अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. या प्रवासात नवनाथ नाईक नवरे आणि तांबे सर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शारीरिक व लेखी परीक्षेची काटेकोर तयारी केली.

अखेर अथक मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मुस्कानने पहिल्याच प्रयत्नात मुंबई शहर पोलीस भरतीत यश मिळवले. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्कानचे यश हे प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय साध्य करता येते, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

