वयाची शंभरी पार केलेले गौंडरे येथील बाबुराव खंडागळे यांचे निधन - सावडताना परिवाराने घेतला पुरोगामी निर्णय - Saptahik Sandesh

वयाची शंभरी पार केलेले गौंडरे येथील बाबुराव खंडागळे यांचे निधन – सावडताना परिवाराने घेतला पुरोगामी निर्णय

करमाळा (सुरज हिरडे) – गौंडरे (ता.करमाळा) येथील बाबूराव निवृत्ती खंडागळे यांचे दि.६ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय  १०१ वर्ष होते. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अंत्यविधीनंतर सावडताना पारंपरिक पद्धतीने राख नदीत/ओढ्यात टाकून जलप्रदूषण करण्यापेक्षा खड्ड्यात टाकून त्या जागी वृक्षारोपण करण्याचा विचार त्यांचे नातू विजय खंडागळे यांनी मांडला व या विचाराला परिवाराने, नातेवाईकांनी पाठिंबा दिला. त्याप्रमाणे राख शेतातील खड्ड्यात पुरून त्यावर वृक्षारोपण केले व पूढे ही त्याचे संगोपन करण्याचे ठरवले आहे. गौंडरे गावात प्रथमच असा विचार मांडून तो  प्रत्यक्षात आणला गेला आहे.

वयाची शंभरी पार केलेले बाबुराव खंडागळे हे शेवटपर्यंत धडधाकटपणे जीवन जगले. रोज सकाळी पहाटे पाच-साडे पाचला उठून ते आपली दिनचर्या सुरू करत. खंडागळे यांचे कान,डोळे शेवटपर्यंत ठिकठाक होते. त्यामुळे त्यांना ऐकायला, बघायला त्रास नव्हता. दात ठीकठाक असल्यामुळे त्यांना खायला देखील त्रास नव्हता. शेवटच्या दिवशी त्यांनी फुटाणे खाल्ल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. हातपाय व्यवस्थित असल्यामुळे ते शेतीत फेरफटका मारत तसेच गावात चक्कर मारून गावातील लोकांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये मिसळत असत. तरुण काळामध्ये त्यांनी शेतीमध्ये खूप कष्ट केलेले होते. सायकलवर त्यांनी विविध गावांना खूप प्रवास केला होता अगदी पुण्या पर्यंत ते सायकल वर जात. त्याबरोबरच त्यांनी सायकलवर कधी पंधरा दिवसाला-कधी महिन्याला पंढरपूरला वारी करायचे.  सात्विक खाणे, व्यायाम, शारीरिक हालचाल यामुळे ते शंभरी गाठू शकले व अगदी शेवटच्या काळात ते आजारपणात गेले.

अंत्यविधी नंतर राख नदीत, ओढ्यात टाकून जल प्रदूषण होत असते. हेच पाणी आपण पिण्यास वापर असतो. त्याऐवजी जर आपण राख खड्ड्यात टाकून वृक्षारोपण केले तर जलप्रदूषण रोखेल, वृक्ष वाढ होईल व वृक्षाच्या रुपात ती व्यक्ती कायम स्मरणात राहील. त्यामुळे लोकांनीही अशा प्रकारे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.  इथून पुढेही आम्ही ‘वसुंधरा परिवार’ च्या वतीने गेलेल्या माणसाच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून पर्यावर संरक्षणाचे काम करणार आहे.

विजय खंडागळे, गौंडरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!