24 वर्षानंतर वडशिवणे तलाव भरला शंभर टक्के

Vadashivane talav

केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : यावर्षी जोरदार झालेल्या परतीच्या पावसाने 18 ऑक्टोबर रोजी वडशिवणे तलाव शंभर टक्के भरला असून सांडवा वाहू लागलेला आहे. त्यामुळे तलाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडशिवणे तलाव हा करमाळा तालुक्यातील मांगी नंतरचा दोन नंबरचा मोठा तलाव आहे. या तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारच्या काळात सन 1902 साली झालेली आहे. तलावाची एकूण पाणी साठवण क्षमता 153 दशलक्ष घनफूट असून एक टीएमसी पाण्यामध्ये हा तलाव सात वेळा भरतो. या अगोदर सन 1998 ला हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता. त्यानंतर तब्बल 24 वर्षानंतर या वर्षी हा तलाव भरलेला आहे.

या तलावातील पाण्यावर परिसरातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. पूर्वीच्या काळी पाऊस जास्त असायचा व तलावात पुरेसे पाणी आल्यानंतर या तलावाच्या पाण्यावर वडशिवने, कविटगाव, सांगवी,बिटरगाव कंदर आदी गावातील शेती बागायत होत होती. परंतु अलीकडे वीस वर्षात पाऊस कमी होऊ लागल्यामुळे शेती बेभरवशाची होऊ लागली. त्यामुळे या तलावात कायमस्वरूपी उजनी धरणाचे पाणी यावे अशी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधींकडे मागणी होऊ लागली. परंतु या मागणीकडे तितकेसे गांभीर्याने घेतले गेले नाही.

सन 2013 ला मंत्रालयात दोन बैठकही झाल्या परंतु उजनी धरणाचे पूर्णपणे पाणी वाटप झाल्यामुळे या योजनेला मंजुरी देता येत नाही असे सांगितले गेले. त्यानंतर सन 2019 च्या विधानसभा मतदानाच्या वेळी या परिसरातील ज्येष्ठ नेते माननीय श्री दिलीप दादा तळेकर यांनी तत्कालीन आमदार यांच्याकडे या तलावात पाणी सोडण्याची मागणी केली व या तलावात पाणी न सोडल्यास मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका केमचे युवक नेते अजित तळेकर यांनी घेतल्यामुळे तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी स्वखर्चातून दहिगाव उपसा सिंचन योजनेतून मलवडी शिवारातून कॅनल द्वारे पाणी वडशिवणे तलावात सोडले होते. त्यावेळी प्रत्यक्षात तलावामध्ये दहा फूट पाणी आलेले होते. त्यानंतर तीन वर्षात अद्यापपर्यंत या तलावामध्ये उजनीचा एक थेंबही आलेला नाही.

विद्यमान आमदारांकडे उजनीच्या पाण्याची मागणी केली असता बेकायदेशीर रित्या पाणी सोडता येत नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली होती. अक्षरशः घागर उशाला व कोरड घशाला अशी अवस्था या परिसरातील शेतकऱ्यांची झालेली होती.

प्रत्यक्षात या तलावामध्ये उजनीचे पाणी कॅनॉलने सोडण्याची योजना प्रत्यक्षात पूर्ण झाली असून झालेल्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळवणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून कॅनॉल खोदला गेलेला आहे.त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देऊन अधिकृतपणे शासन दरबारी ही योजना मंजूर करणे गरजेचे आहे. यावर्षी जरी तलाव पूर्ण भरलेला असला तरी कायमस्वरूपी या भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उजनीतील अतिरिक्त पाण्यातून हा तलाव भरून घेणे गरजेचे आहे.

या सर्व गोष्टीसाठी ही योजना लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचून योजनेला मंजुरी मिळवणे गरजेचे आहे. योजना मंजूर झाल्यास केम परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार असून या भागाचा परिपूर्ण विकास होणार आहे. त्यामुळे वडशिवणे तलाव दहिगाव योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Vadshiwane lake after 24 years hundred percent filled | Kem News | Vadashivane Talav Karmala Taluka Solapur | Saptahik Sandesh news

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!