“आदिनाथ” च्या निवडणूकीत शेतकऱ्यांनी कारखाना आमच्या ताब्यात दिला तर विठ्ठलराव शिंदे कारखान्याप्रमाणेच चालवू व चांगला दरही देऊ – आमदार बबनराव शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने चालला पाहिजे, ही सभासदांची भावना आहे. आदिनाथच्या निवडणुकीमध्ये सभासद, शेतकऱ्यांनी हा कारखाना आमच्या ताब्यात दिला तर विठ्ठलराव शिंदे कारखान्याप्रमाणेच आम्ही चांगल्या प्रकारे चालवू व चांगला दरही देऊ ; असे आश्वासन माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिले आहे.
आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी चिखलठाण येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबीराचे उद्घाटन आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पत्नी सुनंदाताई शिंदे यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आ. शिंदे यांचे फटाके वाजवून हलगीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले, की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांना करमाळा तालुक्याने भरघोस मतदान देऊन निवडून दिले आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना आम्ही नेहमीच न्याय दिला असून, वेळेवर पेमेंटही करत आहोत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना चांगल्या पध्दतीने चालावा; अशी आमची अपेक्षा असून, येणाऱ्या निवडणुकीत हा कारखाना आमच्या ताब्यात दिला तर आम्ही चांगल्या पध्दतीने चालवू आणि दरही चांगला देवू. यामध्ये कोणतेही राजकारण केले जाणार नाही. कमलाभवानी कारखान्याचे पेमेंट काही कारणामुळे थकले आहे. दहा दिवसात सभासदांचे ऊसाचे बिल जमा केले जाईल, असेही आश्वासन आ. शिंदे यांनी यावेळी दिले.
शिंदे बंधूनी आदिनाथच्या निवडणुकीत लक्ष घालावे…
आमदार संजयमामा शिंदे यांनी जि.प. अध्यक्ष असताना कोट्यावधी रूपयांची विकासकामे केली आहेत. तसेच आमदार झाल्यानंतर दहिगाव उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालू ठेवून पूर्व भागाला पाणीपुरवठा केला आहे. तसेच जातेगाव-टेंभूर्णी रस्ता, डिसकळ पुल आदी महत्वाच्या कामांना मंजुरी मिळवून दिली आहे. याबरोबरच अन्य विकामकामांनाही त्यांनी प्राध्यन दिले आहे. गेल्या २० वर्षापासून विठ्ठलराव कारखाना व १० वर्षापासून विठ्ठल कार्पोरेशन या कारखान्यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची दोन महिन्यात निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष घालावे; सभासद तुमच्या पाठीशी राहतील. बबनदादांवर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. एवढेच नाहीतर कारखानदारीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. शेतकरी मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत आहेत. त्यामुळे आदिनाथचा सभासद येणाऱ्या निवडणुकीत शिंदे बंधूवर विश्वास टाकतील. त्याच विश्वासास पात्र राहून विठ्ठलराव शिंदे कारखान्याप्रमाणे आदिनाथ कारखाना चालवावा; अशी अपेक्षा व्यक्त केली.
….राजेंद्र बारकुंड (माजी उपाध्यक्ष, जिल्हापरिषद सोलापूर)
यावेळी एकरी शंभर टन ऊस उत्पादक शेतकरी चंद्रकांत सुरवसे, ऊस वाहतूकदार साहेबराव मारकड यांचा तसेच इंटरनॅशनल परीक्षेत राज्यात पहिले आलेले रणजित नवनाथ मारकड यांचा सत्कार आ. शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. ब्रिजेश बारकुंड यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी राजेंद्र बारकुंड यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक केले. या रक्तदान शिबीरात ३७ जणांनी रक्तदान केले. यावेळी बबनराव शिंदे व सुनंदा शिंदे यांचा सन्मान मनिषा राजेंद्र बारकुंड यांनी केला आहे.
या कार्यक्रमास चिखलठाण सोसायटीचे अध्यक्ष विकास गलांडे, माजी उपसरपंच दिनकर सरडे, कुगावचे सरपंच महादेव कामटे, पत्रकार नाशिर कबीर, बाळासाहेब कोकाटे, जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष समाधान गव्हाणे, श्रीनाथ गव्हाणे, बापूराव ढवळे, माजी जि.प.सदस्य संदिपान बारकुंड, सोमनाथ राऊत, बाबू गोळे, सतीश बनसोडे, दत्ता ढेरे, हनुमंत गव्हाणे, साहेबराव मारकड, चित्रकांत सुरवसे, कैलास बोंद्रे, आबा नलवडे, अतुल जानभरे, अक्षय पवार, बाबू उंबरे, विनोद चव्हाण, युनियन बँकेचे विशाल सुरवसे, जिल्हा बँकेचे मॅनेजर मुटके, संतोष सरडे, महेश कानगुडे, भैय्या लबडे, नवनाथ सरडे, शिवाजी डोके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास दोलतोडे यांनी केले. आभार समाधान गव्हाणे यांनी मानले.