करमाळ्याच्या रेश्मा जाधव यांना ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार प्रदान!

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.२९: संगीत, योगसाधना, सामाजिक कार्य आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी केल्याबद्दल करमाळा येथील महिला कार्यकर्त्यां रेश्मा विजयकुमार जाधव यांना यंदाचा मानाचा ‘दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले आहे. पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शांतीदूत परिवार, डॉ. सुरेश (डी. एस.) राठोड फाउंडेशन, सर्किट बेंच फाउंडेशन आणि इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रेश्मा जाधव यांनी ‘संगीत विशारद’, ‘योग शिक्षक’, ‘सामाजिक कार्य’ आणि ‘कवी’ म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय, सर्जनशील आणि समाजोपयोगी कार्य करून मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नि:स्वार्थी सेवाभावाची आणि दर्जेदार समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या बहुमोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा पद्मश्री उदय देशपांडे , प्रा. डॉ. खा.ज्योतीताई वाघमारे , डॉ. विठ्ठल जाधव ( संस्थापक अध्यक्ष, शांतीदूत परिवार) आणि डॉ. सुरेश  राठोड (संस्थापक अध्यक्ष, डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना रेश्मा जाधव म्हणाल्या की, “हा पुरस्कार माझ्या आजवरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाला मिळालेली मोठी पावती आहे. या सन्मानामुळे समाजाप्रती असणारी माझी जबाबदारी आणखी वाढली असून, भविष्यातही संगीत, योग आणि साहित्य क्षेत्राच्या माध्यमातून लोकहितकारी कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याची नवी ऊर्जा मला मिळाली आहे.” रेश्मा जाधव यांना या पूर्वी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार,  महिला उद्योजिका पुरस्कार, साई कला गुण गौरव पुरस्कार  असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!