टाटा समूहातील तांत्रिक शाखा करमाळ्यात-आयटीआयला नवी इमारत-सहा नवीन अभ्यासक्रम- मंत्री मंगल प्रभात लोढा

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०: राज्यभरात टाटा समूहाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या ५६ अत्याधुनिक तांत्रिक शाखांपैकी एक शाखा करमाळा येथे सुरू करण्यात येणार असून, येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी सहा महिन्यांत नवीन इमारत उभारण्यात येईल तसेच सहा नवीन अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात येतील असे राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आश्वासन दिले.
करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला “मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामकरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री लोढा अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार नारायण पाटील, नगराध्यक्ष मोहिनी सावंत, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल, मदनदास देवी यांचे बंधू खुशालदास देवी सावंत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र राठी,राधेश्याम देवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “करमाळा तालुक्याला मदनदास देवी यांच्यासारखा थोर वारसा लाभला आहे. ज्या काळात शिक्षण घेणारे फार कमी होते, त्या काळात ते गोल्ड मेडलिस्ट आणि उच्चशिक्षित होते. मात्र त्यांनी आपले ज्ञान व कर्तृत्व स्वतःच्या कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राष्ट्रासाठी अर्पण केले. आज देशातील कोट्यवधी नागरिक त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगतात. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाने या संस्थेचे नामकरण होत असल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून, या संस्थेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.” असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सुनील आंबेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “केवळ शिक्षण, व्यवसाय किंवा आर्थिक प्रगती पुरेशी नाही; तर प्रत्येक व्यक्ती आदर्श नागरिक (माणूस) म्हणून घडला पाहिजे. भारत आज जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्यामागे येथील संस्कार आणि माणुसकीची मूल्ये आहेत. मदनदास देवी यांनी हीच मूल्ये देशभर पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांच्या नावाने या संस्थेचे नामकरण होणे ही करमाळ्यासाठी अभिमानाची बाब आहे.” आमदार नारायण आबा पाटील यांनीही आपल्या भाषणात मदनदास देवी यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, “तालुक्याच्या प्रेरणास्थान असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या नावाने आयटीआयचे नामकरण होणे हा करमाळ्यासाठी सन्मान असून, विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे.” राधेश्याम देवी यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी केले, तर आभार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. करमाळा तालुक्याच्या औद्योगिक, तांत्रिक व कौशल्य विकासाला नवी दिशा देणाऱ्या या घोषणांमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


