२५० किमीवरील दोन मंदिरांना जोडणारी सायकलवरील तीर्थयात्रा

माझं मूळ गाव विहाळ, तालुका करमाळा. आमचं गाव दुष्काळग्रस्त असून, रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे अनेक होतकरू तरुण पुण्याकडे स्थलांतरित झाले. मीही त्याच वाटेने आलो आणि कात्रज (पुणे) परिसरात स्थायिक झालो.

आमच्या गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान आहे. मंदिर दक्षिणाभिमुख असून, बालपणापासून मी या देवाचा निस्सीम भक्त आहे. पुण्यात आलो तेव्हा कात्रजमध्येही भैरवनाथाचे मंदिर आहे, हे कळालं. ते ऐकून आणि पाहून अंतःकरणात समाधानाचे, भक्तीचे सूर उमटले. गावच्या देवाची आठवण झाली की मी कात्रजच्या या मंदिरात जातो. या मंदिरातही तेच भाव, तीच मूर्ती, आणि विशेष म्हणजे मंदिरही दक्षिणमुखी – अगदी गावच्या मंदिरासारखंच! त्यामुळे येथे दर्शन घेतल्यावर गावच्या भैरवनाथाचंच दर्शन घेतल्याचा भास होतो.
गावात वर्षातून दोन वेळा भैरवनाथाची पालखी निघते. आणि इथे, पुण्यातही अशीच दोन वेळा पालखी निघते. हे साम्य पाहून माझ्या मनात एक कल्पना आली – या दोन्ही ठिकाणांना सायकलने जोडणारी तीर्थयात्रा करावी. वाहनाने जाणं हे नेहमीसारखंच असतं; पण सायकलने प्रवास करणे हे काहीसं वेगळं, साहसी आणि आरोग्यदायी वाटलं.
चैत्र वैद्य अष्टमीला विहाळ येथे यात्रा असते. त्याआधी आठवडाभर आधी हनुमान जयंतीला सोनारी (तालुका परांडा) येथून ज्योत आणली जाते. सोनारी हेच आमच्या भैरवनाथाचे मूळ ठाणं. म्हणून मी ठरवलं – कात्रजपासून सायकल प्रवास सुरू करून, विहाळमार्गे सोनारीपर्यंत जायचं आणि पुन्हा सायकलने ज्योत घेऊन विहाळमध्ये परतायचं.
ठरवलं आणि प्रत्यक्षात उतरवलं!
पहाटे ३.३० वा. सायकलवर प्रवास सुरू केला. जवळपास २०० ते २५० किलोमीटरचा हा उन्हाळ्यातील प्रवास सोपा नव्हता. त्यामुळे मी आधीच नियमित सराव केला होता. दररोज कात्रज घाट चढत १० किमी सायकल चालवली. सायकलिंगचे सर्व नियम आत्मसात केले.
प्रवास सुरू करताच माझं देहभान हरपलं. लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस ही गावे एका मागोमाग मागे पडत गेली. थकवा, तहान, भूक काहीच जाणवली नाही. माझ्या शरीरात जणू दैवी शक्ती संचारली होती. पुणे (कात्रज) ते भिगवण, सुमारे १०० किमीचा प्रवास मी एका दमात केला!

भिगवण येथे भैरवनाथाचे दर्शन घेऊन विश्रांती घेतली आणि पुन्हा सायकलवरून विहाळकडे निघालो. मार्गात कुंभारगाव, सावडी या गावांतील लोकांनी चहा, नाश्ता, शरबत देऊन स्वागत केलं. त्यांचं प्रेम आणि कौतुक पाहून मी अधिक प्रोत्साहित झालो. सुमारे १५५ किमीचा प्रवास मी ९ तासांत पूर्ण करून गावी पोहोचलो.
मात्र माझी यात्रा यावरच संपली नाही. रात्री १० वाजता गावातील तरुण मंडळी ज्योत आणण्यासाठी सोनारीला निघणार होती. ती मंडळी टेम्पो किंवा दुचाकीने जातात, पण मला सायकलवरूनच जायचं होतं. म्हणून मी सायंकाळी ५ वाजता विहाळहून पुन्हा सायकलने सोनारीकडे निघालो. आणखी ५५ किमीचा प्रवास करत मी साडेनऊच्या सुमारास सोनारीला पोहोचलो.

रात्री १२ वाजता ज्योत घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. मी सायकलवरूनच पुन्हा विहाळमध्ये परत आलो. एकूण अडीचशे किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास मी पूर्ण केला!
या प्रवासात मला अनेक मित्रांची मदत आणि प्रेरणा मिळाली. नाना मारकड, सुनील मारकड यांनी मानसिक बळ दिलं. पानाचंद देवकते यांनी मोटरसायकलवरून साथ दिली. त्यांनी म्हटलं, “आजच्या काळात सायकलिंग खूप महत्त्वाचं आहे. लोक चालत नाहीत, व्यायाम करत नाहीत. वाहनांमुळे प्रदूषण वाढतं, आरोग्य बिघडतं. तुझ्या उपक्रमातून लोकांना प्रेरणा मिळेल.” त्यांच्या या शब्दांनी माझं मन अधिक बळकट झालं.
हा प्रवास मी अगदी गुपचूप केला. घरी, पत्नीलाही सांगितलं नव्हतं. तिला माहीत झालं असतं, तर काळजीने ती नक्कीच विरोध केली असती, आणि कदाचित हा प्रवास अपूर्ण राहिला असता.
या संपूर्ण यात्रेचा यशस्वी प्रवास माझ्या श्रद्धेचा विजय आहे. श्री भैरवनाथ, श्री बाळूमामा, ग्रामस्थ, आणि मित्रमंडळ यांच्या आशीर्वादामुळेच ही तीर्थयात्रा पूर्ण झाली.
✍️ राजूभाऊ देवकते, विहाळ, ता.करमाळा मो. 9011662007


