…देव नाही देवालयी!

“धर्म, जात आणि देव जर माणसामाणसात भेदभाव निर्माण करत असतील, तर अशा तिन्ही गोष्टी मला मान्य नाहीत,” असे स्पष्ट विचार थोर विचारवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. त्यांच्या याच विचारांचा मी देखील समर्थक आहे.

देव, धर्म, जात, मंदिरे, मशीदी या सर्व गोष्टी मानवनिर्मित आहेत. त्यामुळेच आज ३३ कोटी देवांची संकल्पना अस्तित्वात आहे. कुणी जर हे सर्व देवांची नावे सांगू शकेल, तर मी त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देईन, असे मी जाहीरपणे सांगतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवबौद्धांना आवाहन केले होते की, त्यांनी आपल्या घरातील देवघरातील मूर्ती नदीत विसर्जित कराव्यात आणि शिक्षणाची कास धरावी. कारण शिक्षण हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. ज्यांनी हा विचार स्वीकारला, त्यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा व समाजाचा विकास घडवून आणला. मात्र, आजही काहीजण जुन्या रूढी-परंपरांना चिकटून राहिले आहेत. अनेक मातंग समाजातील लोक आजही ‘पोतराज’ संकल्पनेवर विश्वास ठेवतात.

तुळजापूर तालुक्यातील मारुती बनसोडे हे ‘पोतराज मुक्त गाव’ अभियानासाठी प्रयत्नशील आहेत. विविध ग्रामपंचायतींनी या अभियानासाठी ठराव करून त्याला पाठिंबा द्यावा, ही काळाची गरज आहे.

आजचा समाज अजूनही देवळांमध्ये देव शोधत आहे. त्यामुळे लक्ष्मी मंदिर, राम मंदिर, हनुमान मंदिर, तिरुपती मंदिर, शिर्डी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. परंतु, देव खरा कुठे आहे, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.
माझा प्रश्न आहे — जे देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, त्यांनी ३३ कोटी देवांची नावे सांगावीत, आणि मी त्यांना एक लाख रुपये देईन.
कोरोना सारख्या महाभयानक काळात लाखो लोक मृत्युमुखी पडत असताना, देव नव्हे तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वच्छता कर्मचारी हेच खरे देव बनून समोर आले. त्यांच्या कामातच मला देवाचे दर्शन झाले.

म्हणूनच, मंदिरांवर खर्च करण्यापेक्षा शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स यावर पैसा खर्च व्हायला हवा. शाळांसाठी संगणक, प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडांगणे यांची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्यसेवा देणारी रुग्णालये उभारली पाहिजेत. कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोल मिळाले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी काळाची गरज आहे, असे मला वाटते.
✍️ प्रमोद झिंजाडे (अध्यक्ष, महात्मा फुले समाजसेवा मंडळ, करमाळा जि. सोलापूर), मो.९४२१०४२०७२


