करमाळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी 2 कोटी निधी मंजूर : आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

करमाळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी 2 कोटी निधी मंजूर : आ.संजयमामा शिंदे


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून, या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजेरावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे.

करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून, त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे. त्यानुसार आपण करमाळा तालुक्यातील श्री कमलाभवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी निधी मंजूर केला.

त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी २ कोटी निधी मंजूर केलेला आहे. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.

करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला – आ.शिंदे
करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडणेसाठी आत्तापर्यंत आपण करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम करणे ,सांस्कृतिक सभागृह बांधणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी १० कोटी निधी, जिन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी ६ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास, दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी १० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी २५ कोटी ,उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी १८ कोटी, सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी २ कोटी, करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी १ कोटी,निधी मंजूर केलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले आहे. करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता २५ कोटी निधीची मागणी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!