निंभोरे येथील ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक गैरहजर – गटविकास अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी – ग्रामस्थांची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : निंभोरे (ता.करमाळा) येथे गेल्या पाच वर्षांपासून, गावातील प्रश्न समजून घेण्यासाठी व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे प्रत्यक्षपणे उत्तरे देण्यासाठी कोणतीही ग्रामसभा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामसभेतुन उघडपणे विचारावयाचे प्रश्न जैसे थे असेच राहत होते. याच अनुषंगाने राष्ट्रवादी पदवीधर संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर व निंभोरे गावचे उपसरपंच ज्योतीराम वळेकर यांनी 10 ऑगस्ट 2022 रोजी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना, गेल्या पाच वर्षापासून निंभोरे गावामध्ये कोणतीही ग्रामसभा न झाल्यामुळे, येत्या 15 ऑगस्ट रोजी विस्तार अधिकाऱ्याची निरीक्षक म्हणुन नेमणूक करण्यात यावी, व सदरील ग्रामसभा घेण्यात यावी. अशा प्रकारचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने 12 ऑगस्ट 2022 रोजी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ग्रामसभेत निरीक्षक म्हणून स्थापत्य अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करमाळा येथील व्ही. जे. खंडागळे यांची नेमणूक केली होती. व त्याप्रमाणे आजच्या ग्रामसभेसाठी सदरील अधिकाऱ्यांने उपस्थितीसुध्दा लावली होती. परंतु सदरील ग्रामसभेसाठी व लोकांच्या प्रश्नापासून वाचण्यासाठी गावचे सरपंच व ग्रामसेवकाने स्वातंत्र्यदिना दिवशीच्या ग्रामसभेतून पळ काढला. त्यामुळे ग्रामस्थांचे प्रश्न जसेच्या तसेच राहिले गेले. सदर ठिकाणी जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना या सर्व बाबतीत तक्रारी अर्ज तयार केला असून, त्यावर उपस्थित ग्रामस्थांनी सह्या देखील केलेल्या आहेत. व अनुपस्थितीत राहिलेल्या सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करावी. अशा प्रकारची तक्रारी अर्जामध्ये मागणी केलेली आहे. आता या सर्वप्रकरणी अनुपस्थितीत राहिलेल्या सरपंच व ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी मनोज राऊत कोणती कारवाई करणार आहेत. याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
गेल्या पाच वर्षापासून निंभोरे गावामध्ये कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झाली नव्हती. त्या अनुषंगानेच आम्ही गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना निवेदनाद्वारे कळविले होते की, निंभोरे येथे विस्तार अधिकारी यांची ग्रामसभेसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करावी. त्या अनुषंगाने स्थापत्य अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करमाळा येथील अधिकारी व्ही. जे. खंडागळे यांची नेमणूक करण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सकाळी ग्रामपंचायतीसमोरील सरपंच व ग्रामसेवकांनी ध्वजारोहण करुन तेथुन पळ काढला. व त्यांचा मोबाईल सुध्दा बंद करुन ठेवला होता. सरपंच व ग्रामसेवकांनी या ग्रामसभेस दांडी मारल्यामुळे, ग्रामस्थांची घोर निराशा झालेली आहे. या अनुषंगाने आम्ही ग्रामस्थांच्या सहीनिशी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे.
– रविंद्र वळेकर (राष्ट्रवादी पदवीधर संघ करमाळा, तालुकाध्यक्ष)