सलग तीन दिवसात तीन तरुणी बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात सलग तीन तरूणी बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी करमाळा पोलीसात हरवल्याबाबत तक्रार दाखल झाल्या आहेत.
यात २८ ऑक्टोबरला रावगाव येथील ३५ वर्षाची तरूणी ही घरातून कामासाठी म्हणून बाहेर गेली आहे. त्यानंतर ती परत आलीच नाही. तिचा गावात व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध करूनही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर पालकांनी त्याबाबत करमाळा पोलीसात हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. २९ ऑक्टोबरला धायखिंडी येथील २० वर्षाची युवती ही स्वत:हून घरातून बाहेर गेली आहे. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे करमाळा पोलीसात तिच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवली आहे.
अशाप्रकारे मोरवड येथील २० वर्षाची युवती घरातून बाहेर गेली, परत येते म्हणून सांगितले. परंतू ती घरी आलीच नाही. त्यामुळे तिचा शोधाशोध घेऊनही ती न सापडल्याने ३० ऑक्टोबरला ती हरवल्याबाबतची तक्रार करमाळा पोलीसात देण्यात आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी हरवल्याची तक्रार दाखल करून पुढील शोध सुरू केला आहे.

