पाऊस माझ्या मनातला!

उन्हाळा आला की उन्हाच्या झळांनी धरणी कासावीस होते. रानं भेगाळतात. भर दुपारी एकाकी सुन्न वाळलेल्या झाडांमधून रातकिड्यांची उदास किरकिर आपल्याला अजूनच उदास बनवते. पाखरे झाडावर अगदी मलूल बसून असतात. माळावरच्या मृगजळामागे तुषार्त मृग विमनस्क धावताना दिसतात. एरवी प्रसन्न असणारा, निळ्या संथ पाण्याने भरलेला ओढा आता रिकामा असतो. त्याच्या काठावर अस्ताव्यस्त चिलार वाढलेली दिसते. दुपारच्या प्रहरी त्या ओढ्यात खोदलेल्या खड्ड्यात कुणी एखादी स्त्री पाण्याचे भांडे घेऊन सावकाश पाणी भरताना दिसते. तिच्यासाठी त्यावेळेस काळ थांबलेला असतो, काठावरचे मंदिर शांत असते .. त्यावरचा भगवा ध्वज अधून मधून वाऱ्यावर फडफडत राहतो. देवळाच्या गार सभामंडपात चार दोन म्हातारी माणसे अंगाचे मुटकुळे करून गपगार पडून असतात…. उन्हाळ्याच्या रातीही अशाच अस्वस्थ असतात. आणि अशा या अस्वस्थपणातच साऱ्यांना पावसाच्या धुवाधार सरींची ओढ असते. निसर्गाच्या कणाकणाला फक्त हवा असतो पाऊस…

पाऊस म्हटलं की मी अगदी हळवा होतो… तिच्या गोऱ्या गोऱ्या हातांचा मेंदी भरला तळवा होतो…पावसाची विविध रूपे मला आवडतात. घाटामधला मनस्वी पाऊस तर माझा सखा आहे. तो समाधिस्त योग्यासारखा दरी दरीतून धुवाँधार कोसळत राहतो.
‘घाटामधला पाऊस मला उदास भिजवून गेला.
का कसा कुणास ठावूक तिचा श्वास रुजवून गेला….
थेंब थेंब ठिबकत गेले मीही मग उमटत गेलो..
घाटा मधल्या धारेगत मीही मग फुटत गेलो….
कधी कधी पावसांच्या सरींनी कुणी तरी आठवत राहते. एक हळवी याद मनाला विरही डंख करते.. मन सैरभैर होते. मनाच्या उदास कोपऱ्यात पावसाच्या बेभान सरी अविरत कोसळत राहतात… पाऊस येतो. रमणीच्या तरल पैजणासारखा येतो, तिच्या सुंदर डोळ्यासारखा मदिर येतो. तर कधी बाळाच्या मधुर हास्यासारखा देखणा येतो. पाऊस असा केव्हा कुठेही येतो.. त्याच्याकडचे काही थेंब माझ्या मुठीत देऊन जातो. मूठ उघड़ते थेंब सुटतो.. तिच्या माझ्या स्वप्नांना हिरवा गार अंकुर फुटतो..
पाऊस आला की मनाच्या भाववृत्ती अशा बदलतात, मन ओढाळ बनतं. पाऊस हा असा असतो. तप्त विरही ग्रीष्मानंतर येणारा पाऊस हा शिवाच्या दाहक तांडवासारखा असतो तर कधी तो जाईच्या गर्द मांडवासारखा असतो. मग पाऊसधारांनी दिशा दाटून येतात, झाडांच्या नग्न देहावर पाऊस थेंबांची थंड रांगोळी अखंड उमटत जाते.. वळणावळणाच्या निःशब्द वाटांवर पाऊस पाण्याचे देखणे पांघरूण लपेटले जाते. हवेत मातीचा गंध दरवळतो. निवांत पहुडलेल्या ओढ्याच्या अंगामधून पाण्याच्या धारा सळसळत वाहात जातात.
तो येतो.. तुझ्या माझ्या राजस स्वप्नां सारखा…. तुझ्या गुलाबी ओठांसारखा, रात्रीच्या वृक्षावरून घरंगळलेल्या तेजस्वी ताऱ्यांसारखा …. नक्षत्रांच्या चमचमत्या मदहोश दुनिये सारखा … अन् तिच्या मधाळ हास्यासारखा…पाऊस हा असा असतो….

बेभान सुरांच्या मैफलीसारखा, मंदिरातील प्रसन्न घंटा नादासारखा, काळजाला आरपार छेदणाऱ्या तिच्या मधाळ नजरेसारखा.. खरंच, पाऊस एक सूर असतो,
पाऊस एक ताल असतो, पाऊस एक लय असतो. पाऊस एक शब्द असतो.. पाऊस एक याद असतो.. पाऊस मनावर रेंगाळणारा एक स्वाद असतो. पाऊस बांबू बनातील वाऱ्याची शीळ असतो तर कधी पाऊस तिच्या गालावरचा प्रसन्न तीळ असतो..
पाऊस असा असतो. तो आता येईल सर्वस्व उधळत कड्या कपारीतून घोंगावत येईल. माळाच्या सपाट देहावरून तो अलगद ओघळत येईल… मग माझ्याही मनाला बेभान अंकुर फुटतील, आणि मी निसर्गाच्या त्या शिव सुंदर रूपात एक शून्य बनून जाईन..
✍️भीष्मा चांदणे, करमाळा 9881174988



