आठवडी बाजाराचं कवतीक

आता आपण पहिलं बघू बाजार… या प्रत्येक बाजारामध्ये एवढी गर्दी दिसत असते की, बहुतेक माणसं मोजता येणार नाहीत. पण खरंतर बाजारात दोनच माणसं असतात. ती म्हणजे एक घेणारा आणि दुसरा विकणारा. आता तिसरा पण माणूस कधी कधी सापडतो म्हणजे तो असतो पण सहसा सापडत नाही कारण तो आपला हात साफ करून घ्यायला आलेला असतो.

त्यातल्या त्यात आठवडी बाजार म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते आपलं खेडेगाव भोवतालच्या पाच पंचवीस गावाशी नाळ जोडलेलं तसं त्यांचा या गावात या ना त्या कारणाने रोज राबता जसे की दूध…अंडी…डोईवर माळव्याचा भार घेऊन घरोघरी विकून माळवं तर आठवडी बाजार म्हणजे जी बाजार पटांगण गावच्या एक वेगळ्या दिशेला तिथं आठवडाभर कुणी ढुंकून सुद्धा पाहत नाही, पण आदल्या दिवशी सांच्याला साफ सफाई करून दुसऱ्या दिवशी म्हणजे आठवडी बाजारच्या दिवशी ती पटांगण एवढं बाळसं धरतयं एवढा बहर येतोय पार मावळल्यावर अंधार पडायला लागला तरी तिथून जाऊ वाटत नाही. त्या ठिकाणी गाव गावची छोटी विक्रेती आपला माल घेऊन येतात विक्री करतात ज्या ठिकाणी भरपूर दुकानं नाहीत व असे दुकानं असणाऱ्या ठिकाणी जाणं गैरसोईचे किंवा आर्थिक दृष्ट्या परवडणारं नसतं तिथे अशा प्रकारचा बाजार भरावला जातो जास्त करून ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे. अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो आणि एक विशेष म्हणजे हा आठवडी बाजार गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे. इतर दिवसापेक्षा या दिवशी प्रत्येक दुकानदाराची उलाढाल नेहमीपेक्षा जास्त होत असते.
आठवडी बाजाराचं एक असतं तिथे वस्तूच्या देवाण-घेवाणी बरोबरच भावनांची…अडचणीची…सल्ल्यांची… देवाण-घेवाण होत असते. दुपारपर्यंत आणलेला माल विकून आठवड्याचे वाण समान खरेदी करून या बाया बापड्या बाजाराच्या एका कडेला असणाऱ्या दाट लिंबाच्या झाडाखाली विसावतात. या झाडाखाली काय घडत नाही. मी सुद्धा बाजारात फिरून कंटाळलो की हमखास या झाडाखाली टेकतो. सावलीच्या कडेला हमखास दोन ते तीन बैलगाड्या सोडलेल्या असतात. उमद्या बैलजोड्या समोरची वैरण चघळत असतात. बुंद्याच्या जवळ मोठमोठ्या सुपांमधील दळण करणाऱ्या मावश्या दिसतात. इथेच धान्य घ्यायचं. झाडाखाली गप्पा मारत दळण करायचं.जवळच असलेल्या गिरणीतून पीठ दळून घ्यायचं बाजार मोडता मोडता परतणाऱ्या बहुतेकांच्या डोक्यावर…सायकलवर आठवडे भराचं पीठ हमखास दिसायचं.

याच झाडाखाली मी कित्येक लग्न जमताना पाहिलीत. त्यांच्या याद्या होताना पाहिल्यात. सोयरीक जुळल्यावर चहा चिवडा मागवून कोंढाळं करून ती संपवताना पण पाहिलयं. म्हाताऱ्याच्या जरबेनं काडीमोड होता होता वाचलेले संसार सुद्धा इथे बघितलेत. एखाद्याचे शेत दुष्काळात अगदीच विस्कटलेलं असताना सगळी सोयरी धायरी त्या माणसाला मदत करून नव्या दमानी उभं करताना पण मी या लिंबाखाली पाहिलीत. नुसते पाहिली नाहीत तर इतक्या दिवस बाजारात जात असल्यामुळे नावानिशी मी तिथल्या प्रत्येकाला ओळखतो. त्यामुळे त्यांच्या चहा चिवड्याच्या पार्टीत मी पण सहभागी झालोच हट्टाने त्यांच्या चहाचे पैसे पण कधीकाळी दिलेत. इथं अजूनही मिठाईच्या नावाखाली लाल गुडीशेव आणि बुंदीचे लाडू मिळतात तिखटाच्या नावाखाली भेळ भत्ता आणि भडंग हाच येथील मुख्य पदार्थ आहे.
शहरातल्या मुख्य बाजारपेठेच्या मेन रोडवर ए सी च्या दालनामध्ये मुलीसाठी लाखाचा दागिना घेणारी आई छान दिसते, पण इथे लिंबाच्या थंड सावलीत बसून गालावर हाताचा मुटका ठेवून तिच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत असलेली आई मला अधिक जवळची वाटते. असं म्हणतात की कासवीन आपल्या पिल्लांना नुसत्या नजरेने वाढवते तशी लेकीला त्याच नजरेने पाहणारी आई मी या लिंबाखाली बघितली नातवंडासाठी घेतलेला गुडीशेवचा पुडा मुलीच्या पिशवीत बळच कोंबताना आई मला जगातली सगळ्यात श्रीमंत आई वाटते. तर आठवडी बाजार म्हणजे रानात सकाळी लवकर जायचं वांगी…गवार…शेवगा… चवळी… घेवडा…वाटाणा दोडके…टमाटे… भोपळी… कारली… असे वाण तोडून तागापासून विणलेले गुण नाही तर बांबूने विणलेल्या पाटीत भरायचं. गाजर,भुईमूग, रताळी सारखी वाण आदल्या दिवशीच शेतातून घरी यायची. त्याकाळी ही टोपली विणायचं काम बुरुड बांधव करायची त्यांची उपजीविका ही टोपल्या…पाटी…कणगी कंगुली विणून चालायची पोरांना खेळणी…खाऊ नवे कपडे…असायचे तसे मला पण त्या हॉटेल वाल्याच्या समोरच्या बरणीतले लाडू खूणवायचे त्यामुळे बाजारात गेल्यावर मी बाबांना हॉटेलला चलायचा आग्रह करायचो. मिळेल त्या टेबलाला चिकटलेल्या वेताच्या खुर्चीवर मी आणि बाबा बसायचो. बाबांनी एक लाडू माझ्यासाठी मागवायचा आणि स्वतःसाठी फक्त चहा प्यायचा.

आठवडी बाजारात विक्रेते मिळेल तिथं जागेवर बसतात दाटीवाटीने जिन्नस ठेवतात तरी देखील थोडीशी शिस्त असतेच एका रांगेत भाजीपाला एका रांगेत कपडे एका रांगेत मिठाई भेळ तर एका रांगेत किराणा एकीकडे पादत्राने तर एक दुसरीकडे किसणी…दोरखंड तिथेच कुठेतरी मडकी, गाडगी एका रांगेमध्ये भवरे भिंगऱ्या फुगे अशी खेळणी तर त्यापुढं विळे खुरपी एका रांगेत पाटा वरवंटा असा ग्रामीण जगण्याचा बारकाईने विचार झालेला असायचा अगदी सुया, बिब्बे,करगोटे यांचीही वाण नसायची स्वच्छता सुचवलेली असते त्याचे कुठंही प्रशिक्षण झालेलं नसतं मिळेल त्या जागेवर टोपली घमेली,पाटी,गोणी टाकून बसायचं आणि अधून मधून ओरडायचं दहा रुपये किलो वगैरे बाजारात असलेले कट्टे सर्वांनाच उपलब्ध असतात पण हे सारं एक अद्भुत रंगाचे मिश्रण असतं त्यात हलणारा हलणारी ओरडणारी माणसं रंगीबेरंगी. वस्तू,भाज्या, फळं, मिठाया तसेच रंगीबेरंगी कापडं असा एक भव्य कलरफुल रंगमंच असतो. तिथं तो या धकाधकीच्या जीवनात चारही बाजूंनी सोसायट्या असल्या तरी दोन्हीकडच्या आयुष्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. हा बाजार म्हणजे एक स्वतंत्र व अर्थपूर्ण संस्था असते. त्याचे व्यवहार पूर्ण वेगळे असतात. त्यांच्या आयुष्यातील प्राथमिकता या आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात.

आठ दिवसातून भरणाऱ्या बाजारात पंचक्रोशीतून माणसं येत असतात. त्यांच्या अडचणी… आनंद…गरजा… अगदी वेगवेगळ्या असतात. नवीन लग्न झालेली एखादी सुनबाई आपल्या संसाराची सुरुवात या बाजारातूनच करते. पहिली भाग्याची खरेदी असते कुंकवाचा करंडा हातभर बांगड्या लक्ष्मी म्हणून झाडू आणि धान्यासाठी सुप भाकरीसाठी टोपलं हे अत्यंत श्रद्धेनं घेतलं जातं. त्याच बरोबर पाटा वरवंटा लहान-मोठी भांडीही खरेदी केली जातात. असं नवीन दांपत्य जेव्हा बाजारात खरेदी करत असतं तवा त्यांच्या डोळ्यांमधली स्वप्ने…चेहऱ्यावरचा आनंद मोहक असतो. त्यांच्याकडे नुसतं पाहून देखील त्यातील दोन चार तुषार आपल्यावर उडाल्याखेरीज राहत नाही कोणी शेतकऱ्याचा पोरगा पाठीवर पटक्याचा शेमला सोडून अगदी मस्तीत बाजारात हिंडत असतो. आपल्या बैल जोडीला नजर लागू नये म्हणून काळी वीण खरेदी करतात गळ्यातल्या घुंगुरमाळा निवडताना किंवा शिंगांना लावायच्या पितळी शेंब्या खरेदी करताना आपल्या कोपरी मधल्या पैशाचा हिशोब करीत असतो. एक तर त्याला आवडलेली घुंगुरमाळ त्यांनी दोन आठवड्यापूर्वीच निवडून ठेवलेली असते. आता घासाघीस करून ती योग्य दारात कशी मिळेल याची चिंता त्याच्या डोळ्यात दिसतेच पण अक्कडबाज मिशा राखलेल्या त्या चेहऱ्यावर ती घुंगरू पाहताना अगदी हरकून गेलेल्या लहान मुलाचा आनंदही असतो. सौदा ठरल्यानंतर दुकानदाराकडे पाठ करून चोर खिशातून सावधगिरीने पैसे काढताना तो मजेदार दिसतो. या बाजाराच्या अनेक गल्ल्यातून अनेक आयुष्य एकमेकांना स्पर्श न करता वाहत असतात आणि गच्च भरलेला बाजार जवा आवरला जातो तेव्हा जरा रोडावल्या सारखा दिसतो पण एक आहे या अशा टायमाला प्रत्येकाला घरी जायची लगबग असते कुणी रेल्वेने…कोणी एस टी ने… आलेला असतोय ज्याची बैलगाडी नाहीतर खाजगी वाहन असतं त्याचं काही नाही बाकीच्याला आपली बाचकी योग्य ठिकाणी नेण्यासाठी पन्नास रुपये डागा गणिक फर्लांगभर अंतरासाठी द्यावे लागतात हाच भाव सकाळी 30 रुपये डाग असा असतो यालाच काहीजण आठवडी बाजार म्हणतात.
✍️किरण बेंद्रे, पुणे 9860713464

