नूतन आमदार नारायणआबा पाटील यांच्या समोरील आव्हाने - Saptahik Sandesh

नूतन आमदार नारायणआबा पाटील यांच्या समोरील आव्हाने

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीला नेहमीच आघाडी इकडून तिकडे गेलेली दिसते. सन २०२४ च्या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून १७ व्या फेरी पर्यंत नारायण आबा पाटील यांना आघाडी वाढत गेली. सतराव्या फेरीला जवळपास ३३ हजारापेक्षा जास्त आघाडी मिळाली होती. विशेष म्हणजे हीच आघाडी यशासाठी पाटील यांना उपयुक्त ठरली. करमाळा विधानसभा मतदार संघ हा एकमेव मतदार संघ असा आहे, की शेवटच्या क्षणापर्यंत कोण निवडून येईल हे सांगता येत नाही. सन २०१४ आणि २०१९ ला हे चित्र संपुर्ण मतदारसंघाने अनुभवले. यावेळी तसे झाले नाही. तालुक्यातील १७ फेऱ्या तर आघाडीच्या गेल्या पण त्यानंतर शेवटच्या आठ फेऱ्यातही फारसे चित्र बदलले नाही. त्यामुळे संजयमामा यांचा दारुण पराभव झाला.


नारायण आबा पाटील या एका जिद्दी व धडपड्या प्रतिनिधीकडे आमदारकी आली आहे. सर्व सामान्य परिवारातील प्रतिनिधीकडे जनतेने पुन्हा एकदा हे सन्मानाचे व कर्तृत्वाचे पद दिले आहे. ना मोठा घराणा, ना मोठे शिक्षण, ना मोठ्या संपत्तीचा वारसा ना साखर कारखानदारीचे वलय. वलय होते ते सर्वसामान्य कार्यकर्त्याचे. विशेष म्हणजे त्याच जोरावर त्यांना हे यश मिळाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप, करमाळा शहरातील सावंत गटाचे व मोहिते-पाटील गटाचे मिळालेले पाठबळ आणि पाटील गटाची असलेली भक्कम साथ यामुळे आबा यांना ही पुन्हा एकदा दुर्मिळ अशी संधी मिळाली आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आता नारायण आबांच्या हातात आहे. या तालुक्यातील मतदार तसा हुशार आहे, चाणाक्ष आहे. संधी देण्याबाबत तो कधीही मागे रहात नाही; पण संधी देवूनही काहीच केले नाहीतर तो घरपोहोच करायला मागेपुढे पाहात नाही आणि काम करणाऱ्याला भरभरून मतदान केल्याशिवाय रहात नाही. यावेळी आबांना जे झाले मतदान त्यातून स्पष्ट झाले.

मुळातच हा तालुका विकासाच्या किनाऱ्यावर येऊन ठेपलेला आहे. आमदार पाटील यांच्या दृष्टीने ती बाब अत्यंत महत्वाची आहे. पाडाला आलेले फळ चाखायला वेळ लागत नाही. याप्रमाणे तालुक्यातली बहुतेक कामे पाडाला आलेली आहेत. दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम झाले पण उपचाऱ्या नाहीत. थोडा जोर दिला तर ते काम लवकर पूर्ण होऊ शकते, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आलेले पाणी शेतात गेलेतर त्याचे श्रेय अर्थातच आबांना जाणार आहे. कुकडीचे पाणी टेल टू हेड दिले जात नाही. काही चाऱ्या व उपचाऱ्याची कामे राहिली आहेत. ती कामे करून घ्यावी लागणार आहेत पण त्यापेक्षा या तालुक्यात पाणी आणणे हे खमक्या माणसाचे काम आहे. पुर्वी डिगामामांनी व नारायण आबांनीच आणले होते. कुकडीचे पाणी मांगी, राजुरी, वीट, कुंभेज या तलावात पुरेपूर मिळाले तर खुप मोठे काम होऊ शकते. तालुक्यामध्ये वीजेचा अजुनही प्रश्न आहे. काही उपकेंद्रांची गरज आहे. त्यासाठी वरीष्ट पातळीवर लढावे लागणार आहे. याशिवाय सौरउर्जेवरील पंपाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
तालुक्यातील अनेक रस्ते आबांच्या कारकिर्दीत झाले पण काही रस्ते अजुनही होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करावा लागणार आहे. त्याशिवाय तालुक्यातील रस्त्याची स्थिती सुधारणार नाही.

पुर्नवसन भागातील गावातील रस्ते दुरुस्तीसाठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यातील पाणी पुरवठा योजना वीज बिल, कर्मचारी पगार यामुळे बंद पडल्या आहेत. दुष्काळात शासन चालवते नंतर त्या योजना बंद असतात, त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या बरोबरच रुग्णासाठी अद्यायावत रुग्णालय आवश्यक आहे. तसेच या तालुक्यात तंत्रज्ञान व उच्च शिक्षण, वैद्यकिय शिक्षण सुविधा नाहीतच, त्यासाठी तालुक्यातील मुलांना बाहेर जावे लागते. शिक्षणासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे. गेल्या २७ वर्षापासून करमाळा एम. आय. डी. सी. चे काम रेंगाळले आहे. फार काही नाही पण संबंधित आधिकाऱ्याच्या मागे लागलेतर व नवीन उद्योजकांना आमंत्रित केलेतर तालुक्याचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकते. त्यामधून बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते, पण त्याकडे आमदार विशेष लक्ष देत नाहीत. ते काम आबांना करावे लागणार आहे.

गेल्या पाच वर्षात अधिकृत आमसभा झाली नाही. सरकार स्थापन झाल्यावर आमसभा घ्यावी लागेल व सर्वसामान्यांना मुक्तपणे बोलण्याची संधी द्यावी लागेल. कोळगाव प्रकल्पाची राहिलेली कामे, सहकार क्षेत्रातील कामे, अशी अनेक कामे असलीतरी काही महत्वाच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. जेऊर ते टेंभूर्णी पट्ट्यात शेतीपुरक औद्योगिक वसाहत उभारण्याची गरज आहे. या भागात केळी, लिंबू, पपई अशी फळझाडाची शेती होते, यावर प्रक्रिया
करणारे उद्योग उभे करण्याची गरज आहे. तालुक्यात चार साखर काररखाने आहेत पण यावर्षी एकही कारखाना सुरू नाही. लाखो टन ऊस हा बाहेरच्या कारखान्यांना द्यावा लागणार आहे. बाहेरचे कारखाने त्याना गरज असेलतरच सन्मानाने ऊस नेतात नाहीतर शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडीला आणतात. हीबाब लक्षात घेऊन तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण बाजुला ठेवून तालुक्याचे साखर कारखाने सुरू करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी लागणार आहे. उजनी भागात पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यासाठी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. महिलांसाठी एकही मोठा उद्योग नाही. तालुक्यात शेकडो बचतगट आहेत पण यशस्वी बचत गट नाहीत. या गटांना आधार देवून करण्याची गरज आहे.

अपवाद वगळता मोठे काम सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्यांना अक्षरश: चिरडतात. ते मुजोर झाले आहेत. त्यांना आपण जनतेचे नोकर आहोत याची आठवण करून देण्याची गरज आहे. ते काम तात्काळ आबांना करावे लागणार आहे. तालुक्यातील गवापातळीवरचे रस्ते, पाईप लाईन आडवण्याचे प्रकार मोठे आहेत. त्याकडेसुध्दा लक्ष देण्याची गरज आहे. अशा स्वरूपाची कामे जर आबांनी केलीतर आबांची कारकिर्द तालुकावासीय कधीही विसरू शकणार नाहीत व पुन्हा निवडणुकीसाठी त्यांना मतदार धावपळही करू देणार नाहीत. त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!