नीटनंतर टीईटीवरही प्रश्नचिन्ह; २८ जूनची परीक्षा रद्द

केम(संजय जाधव): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रविवार (दि. २८ जून) रोजी नियोजित असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेसंदर्भातील संशयास्पद माहिती आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.
राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, भिवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संबंधित माहितीची तातडीने पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये संशयितांकडे आढळलेल्या काही प्रश्नांचे टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साम्य असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे.

परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत राज्य परीक्षा परिषदेने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील सुमारे एक लाखाहून अधिक उमेदवार या परीक्षेला सामोरे जाणार होते. सोलापूर जिल्ह्यातही परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, संशयास्पद माहिती समोर आल्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान, परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

याच पार्श्वभूमीवर, नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर आता टीईटी परीक्षेबाबतही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होत असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी व बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे मेहनत घेणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“विद्यार्थी व बेरोजगार तरुणांना सातत्याने विविध परीक्षांमधील पेपरफुटीचा फटका बसत आहे. सेवेतील शिक्षकांना दिलेल्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने शासनाने सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षेचे आयोजन करावे.” — विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना, सोलापूर

