कृतज्ञतेचा अनोखा सोहळा! केममध्ये ‘सोन्या’ बैलाचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न

केम(संजय जाधव): केम येथील श्री ऊत्तरेश्वर महाराजांच्या पालखीचे मानकरी असलेल्या ‘सोन्या’ बैलाच्या प्रथम पुण्यस्मरण व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन रविवारी मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. या निमित्ताने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास केम व परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
सोहळ्यानिमित्त नंदेश्वराची प्राणप्रतिष्ठापना श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे मठाधीश जयंतगिरी महाराज व स्वामी कुंभार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात संपन्न झाली. या पूजाविधीसाठी राहुल कोरे, त्यांच्या पत्नी सरपंच सारिका कोरे तसेच प्रकाश कोरे हे सपत्नीक उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठेनंतर सकाळी ह.भ.प. अनिरुद्ध निंबाळकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा “जन्म आलो याचे आजी फळ झाले साचे…” हा अभंग निरूपणासाठी घेत भक्ती, संतसंग आणि जीवनातील कृतज्ञतेचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. त्यांच्या ओजस्वी निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध झाले.

त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता सोन्या बैलाच्या समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

कार्यक्रमास जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीपदादा तळेकर, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर, माजी सरपंच तथा युवा नेते अजित तळेकर, अनंता तळेकर, श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, विश्वस्त मनोज सोलापूरे, मोहन दौड, माजी सभापती शेखर गाडे, शिवसेनेचे हरि तळेकर, अविनाश तळेकर, सतीश खानट तसेच टिळक मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय पांगरे, वडशिवणे, बिटरगाव आणि केम येथील भजनी मंडळांनीही सहभाग नोंदविला.
केम येथे प्रथमच एका बैलाच्या पुण्यस्मरण व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने परिसरातील भाविकांमध्ये विशेष उत्सुकता होती. भक्तिभाव, कृतज्ञता आणि परंपरेचा संगम असलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

