अन्नदान,वृक्षारोपण व सामाजिक सलोखा जपत करमाळ्यात मोहरम सण साजरा -

अन्नदान,वृक्षारोपण व सामाजिक सलोखा जपत करमाळ्यात मोहरम सण साजरा

0

करमाळा(प्रतिनिधी) :मोहरमच्या निमित्ताने इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन, करमाळा आणि सकल मुस्लिम समाज, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

विविध कब्रस्तानांमध्ये १०१ वृक्षांची लागवड

करमाळा शहरातील विविध कब्रस्तानांमध्ये १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. हाजी युसुफ आतार, हाजी कलीम काझी, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, मौलाना सय्यद अली, मुफ्ती अबू रेहान, मौलाना सिकंदर, मौलाना मुजाहीद, मौलाना वाजिद आणि मौलाना अन्वर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना हाजी कलीम काझी यांनी शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत असून त्याचा परिणाम पर्यावरण व मानवी जीवनावर होत असल्याचे सांगितले. हवामान बदल, पावसाचे कमी प्रमाण आणि वाढते तापमान लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुफ्ती अबू रेहान यांनी प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात किमान एक झाड लावावे, असे आवाहन केले. झाडांमुळे मिळणारी सावली, फळे आणि पर्यावरणाचे संरक्षण हे समाजासाठी मोठे पुण्यकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.



श्रीराम प्रतिष्ठान येथे अन्नदान

मोहरम तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त करमाळ्यातील श्रीराम प्रतिष्ठान येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हाजी कलीम काझी आणि सावंत गटाचे नेते पैलवान गणेश सावंत यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष जमीर सय्यद, समीर शेख, मुस्तकीम पठाण, नगरसेवक हुमरान मुलाणी, जहांगीर बेग, नायब तहसीलदार सादिक काझी, युसुफ बागवान, ज्येष्ठ पत्रकार नरसाळे, रमजान बेग, इम्तियाज पठाण, किरण दुरगाळे, अलिम खान, समशेर मदारी,फत्तु मदारी, अस्लम मदारी, उस्मान मदारी,रफीक मदारी,फिरोज मदारी,जमीर मदारी,रियाज मदारी,सलीम मदारी.जावेद मदारी तसेच विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नालसाहेब सवारीचे स्वागत; सामाजिक ऐक्याचा संदेश

कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध नालसाहेब सवारीचे स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून आणि संत गाडगेबाबा यांच्या साहित्याची भेट देऊन सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रथमच मोहरमच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे हा उपक्रम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. गेल्या चार दशकांपासून गणेशोत्सव आणि शिवजयंती मिरवणुकांमध्ये जामा मस्जिद ट्रस्ट व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!