करमाळा तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये पाचवीच्या वर्गांना मंजुरी

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तालुक्यातील १३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पाचवीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावे लागू नये, शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये आणि पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा या उद्देशाने अनेक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी इयत्ता पाचवीच्या वर्गांना मंजुरी देण्याची मागणी सातत्याने केली होती. आता झालेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच पाचवीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणासाठी होणारी पायपीट, वेळ आणि आर्थिक खर्च कमी होणार असून हा निर्णय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

या शाळांचा समावेश
मंजुरी मिळालेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा वाघाचीवाडी, मानेवस्ती (कंदर), सुपनवरवस्ती (धायखिंडी), म्हसेवाडी (अर्जुननगर), गुटाळवस्ती (केम), पायघनवस्ती (शेलगाव क.), चौधरवाडी (झरे), गारगुटवस्ती (उमरड), चव्हाणवस्ती (मांजरगाव), हुलगेवाडी (कोर्टी), नाळेवस्ती (विहाळ), धगटवाडी (रायगाव) आणि इंगळेवस्ती (कंदर) या १३ शाळांचा समावेश आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांच्या सहकार्यामुळे हा शैक्षणिक प्रश्न मार्गी लागला आहे. भविष्यातही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय घेतले जातील. –गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष

