राम शिंदे यांच्या वक्तव्याचा मांगी परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध

करमाळा(प्रतिनिधी) : मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हळगाव कृषी महाविद्यालयाला पाणी देण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात गेल्या १५ दिवसांपासून मांगी व परिसरातील शेतकऱ्यांकडून व स्थानिक नेत्यांकडून विरोध सुरू असताना, माजी मंत्री व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वक्तव्यानंतर हा विरोध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत, मागण्या मान्य न झाल्यास सामुदायिक जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

करमाळा शहरातील एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राम शिंदे यांना पत्रकारांनी मांगी तलावातील पाण्याच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, त्यांनी मांगी तलाव हा कुकडी लाभक्षेत्रात वर्ग असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मांगी तलाव सरकारच्या नोंदीत कुकडी लाभक्षेत्रात वर्ग नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, या वक्तव्यामुळे आधीच असलेल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.
शेतकऱ्यांच्या मते, एवढ्या महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य होणे दुर्दैवी असून, त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास जीवाची पर्वा न करता सामुदायिक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित मंत्री व शासन जबाबदार राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील सुमारे २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा तलाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, दरवर्षी केवळ ५० ते ६० टक्के पाणीसाठा जमा होतो. त्यातून शेती व पिण्याच्या पाण्याची मर्यादित गरज भागविली जाते.

लाभक्षेत्रातील १२ गावांसाठी बोरगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे ही योजना अनेक वर्षांपासून बंद असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत शासनाने हळगाव कृषी विद्यालयाला पाणी देण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक शेतकरी व नागरिकांवर अन्याय होईल, असा आरोप करण्यात आला आहे.
“मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करून तलावात वर्षभर किमान एक टीएमसी पाणीसाठा कायम ठेवावा. त्यानंतरच इतरत्र पाणी उचलण्याचा शासनाने विचार करावा. त्या भूमिकेला आमचा कोणताही विरोध राहणार नाही.”
— संभाजीराजे बागल, बागायतदार, मांगी
“राम शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलेल्या वक्तव्याचा मी एक शेतकरी म्हणून जाहीर निषेध करतो. मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात वर्ग असल्याचा कागदोपत्री पुरावा त्यांनी शेतकऱ्यांसमोर सादर करावा. तसेच तलावात वर्षभर एक टीएमसी पाणीसाठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दाखवावी.”
— अशोक नरसाळे, बागायतदार, मांगी

