पुण्यातील करमाळा मित्रपरिवार मंडळाची बैठक संपन्न; चिंचवड, जेऊर रेल्वे थांब्यासाठी निवेदन देणार -

पुण्यातील करमाळा मित्रपरिवार मंडळाची बैठक संपन्न; चिंचवड, जेऊर रेल्वे थांब्यासाठी निवेदन देणार

0

करमाळा(प्रतिनिधी) :करमाळा तालुका मित्रपरिवार मंडळ, पुणे व पिंपरी चिंचवड यांच्या त्रैमासिक संवाद बैठकीत विविध सामाजिक व संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत रेल्वे सुविधांबाबत पाठपुरावा, भविष्यातील उपक्रमांचे नियोजन तसेच सदस्यांमधील समन्वय अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी मंडळाचे मुख्य संघटक मनोजकुमार मारकड यांनी प्रास्ताविक करताना संघटनेच्या २०१३ पासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. करमाळा तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या पुणे व पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांची ही सर्वात जुनी व शिस्तबद्ध संघटना असून, सध्या सुमारे १,४०० कुटुंबे या मंडळाशी जोडली गेल्याची माहिती त्यांनी दिली. मोफत सहप्रवासी उपक्रमासह विविध सामाजिक उपक्रमांना पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच विविध व्यावसायिकांकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच माजी आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, आमदार नारायण पाटील, उद्योजक बाळासाहेब कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी संघटनेच्या बिगर राजकीय बैठकींना उपस्थित राहून संघटनेच्या कार्याचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेल्या बैठकींसाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे नामोल्लेख करून त्यांनी आभार व्यक्त केले. भविष्यातील उपक्रमांसाठी मुख्य संघटक म्हणून सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही देत त्यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ सदस्य नंदकुमार तळेकर यांची विद्यार्थी समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पोलीस अधिकारी धर्मराज आवटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर झालेल्या चर्चेत पुणे व पिंपरी चिंचवड येथून जेऊरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना चिंचवड येथे थांबा मिळावा, तसेच अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना जेऊर येथे थांबा देण्यात यावा यासाठी रेल्वे विभागाला निवेदन देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचेही निश्चित करण्यात आले.

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या करमाळा तालुक्यातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक व उपयुक्त उपक्रम लवकरच आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे सदस्यांनी कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.

संघटनेचे संघटक व उद्योजक संतोष कांबळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सभासदांशी संवाद साधून संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व सदस्यांसाठी चहापानाची व्यवस्था केल्याबद्दल सभासद गोविंद जगदाळे यांचा विशेष सत्कार करून उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. पुढील त्रैमासिक बैठकीची माहिती लवकरच मंडळाच्या अधिकृत समूहावर प्रसारित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!